पुण्यात 25 हून अधिक जणांचं पोलीस संरक्षण काढलं; राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाके यांना मात्र अभय

पुणे पोलिसांच्या सुरक्षा आढाव्यात अनेक बड्या व्यक्तींचं संरक्षण काढण्यात आलं, मात्र दोन नावांबाबत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

News Photo   2026 10 27T144639.036

Pune Police Security Cover

Pune Police Security Cover : पुणे शहर पोलिसांच्या विशेष शाखेनं शहरातील (Pune) व्यक्तींना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाचा आढावा घेत मोठा निर्णय घेतला आहे. 23 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या पोलीस संरक्षण गठीत समितीच्या बैठकीत 25 हून अधिक व्यक्तींचं संरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, 24 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रातून याबाबतची माहिती उघड झाली आहे. उद्योगपती, राजकीय विश्लेषक, चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा संरक्षण काढण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

या निर्णयात सर्वाधिक लक्ष वेधणारी बाब म्हणजे सध्या फरार असल्याचं सांगितलं जाणारं बारामतीतील उद्योगपती राणा सूर्यवंशी याचं पोलीस संरक्षण कायम ठेवण्यात आलं आहे. बारामती विमानतळाजवळ त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तो फरार असल्याची माहिती समोर आली असतानाही त्याला देण्यात आलेलं वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाचं संरक्षण जैसे थे ठेवण्यात आलं आहे. याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचंही संरक्षण कायम ठेवण्यात आलं असून, त्यांना एस्कॉर्ट वाहनासह 1+1 सशस्त्र पोलीस कर्मचारी पुरवण्यात आले आहेत.

एक कोटीची पॉलिसी आणि तीन भावांचा गोंधळ; अफरातफरीच्या टिझरने वाढवली उत्सुकता

दरम्यान, पोलीस संरक्षण काढण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट, सरहद संस्थेचे संजय नहार, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील वकील आशिष सातपुते यांचं संरक्षण काढण्यात आलं आहे. याशिवाय सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला, उद्योजक पुनीत बालन, राजकीय विश्लेषक तहसीन पुनावाला, चित्रपट निर्माते मिहिर कुलकर्णी, अजिंक्य डी वाय पाटील, व्यावसायिक मिशेल योहान पुनावाला आणि योहान झवेरी पुनावाला यांचाही या यादीत समावेश आहे. पुण्यातील काही बांधकाम व्यावसायिकांचं संरक्षणही कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहर पोलीस दलाची विशेष शाखा दर एक ते दोन महिन्यांनी शहरातील पोलीस संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेते. संबंधित व्यक्तींची सुरक्षा कायम ठेवायची, त्यात वाढ करायची किंवा संरक्षण काढून घ्यायचं, याबाबत या बैठकांमध्ये निर्णय घेतला जातो. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध व्यक्तींना देण्यात आलेल्या संरक्षणाचा फेरआढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत 25 हून अधिक व्यक्तींचं संरक्षण काढण्यात आल्याचं सांगण्यात येत असून, राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाके यांचं संरक्षण कायम ठेवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेतील बदलांची चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version