ब्रेकिंग : पुण्यातील पाणी कपात रद्द; शनिवारपर्यंत पालिका शाळांना सुट्टी, महापौरांची घोषणा

आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांचा मुक्काम ९ जुलै ऐवजी ७ जुलैपासून शहरात असून, महापालिकेच्या १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

PMC

PMC

Pune Water Cut Cancel Till 12th July :  पुणे महापालिकेने आषाढी वारीनिमित्त आज रात्री १२ पासून ते १२ जुलै पर्यंत पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आळंदीला पूर आल्याने वारकऱ्यांचा पुण्यात दोन दिवस आधी मुक्काम होणार आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी कपात तातडीने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या शाळांना उद्यापासून शनिवारपर्यंत सुट्टी

तसेच आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांचा मुक्काम ९ जुलै ऐवजी ७ जुलैपासून शहरात असून, महापालिकेच्या १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे उद्यापासून (दि.7) रविवारपर्यंत मनपा शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतला आहे. भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले शाळा आणि आंबेडकर कॉलेजमध्ये तंबू उभारण्यात आले असून, सुमारे १,००० लोकांची सोय करण्यात आली आहे.

पुणे शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये मागील कालावधीमध्ये (दि.१४/६/२०२६ अखेर) पाऊस न झाल्याने व धरणामधील पाणीसाठा कमी असल्याने संदर्भ क्र.१ च्या जाहिर निवेदनानुसार दि.१५/६/२०२६ पासून पुणे शहरामध्ये एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करून त्याअन्वये पाणी कपात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणामधील पाणी साठ्यामध्ये वाढ होत असून पुणे शहरामध्ये पालखी २०२६ चे औचित्य साधून बहुसंख्येने वारकरी समूदाय यांचे आगमन होत असल्याने तूर्तास दि.७/७/२०२६ पासून ते दि.१२/७/२०२६ पर्यंत संबंधीत पाणीकपात रद्द करण्यात येत आहे.

पाणी कपातीबाबतचा पुढील निर्णय 12 जुलैनंतर

१२/७/२०२६ अखेर धरण क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस व धरणामधील पाणीसाठा याबाबी विचारात घेऊन पाणीकपाती बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी पाणीपुरवठा विभागाकडील सर्व अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जलशुध्दीकरण केंद्र व पंपिंग तसेच वितरण विभाग यांनी याची नोंद घेऊन वरील नमूद कालावधीमध्ये पुणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घेण्याचे निर्देश पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिले आहे.

आळंदीमध्ये न येण्याचे वारकऱ्यांना आवाहन 

आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार असून, पावासाचा जोर बघता वारकऱ्यांना आणि भाविकांना आळंदीमध्ये न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.

कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाकडून वारकऱ्यांना करण्यात आाली आहे.

Exit mobile version