Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पीएमपीच्या महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या डेपो मॅनेजर विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती आहे. याबाबत राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकेच नाही तर डेपो मॅनेजरच्या या त्रासाला कंटाळून महिला वाहकाने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही उघडकीस आले आहे.
या प्रकरणी महिला वाहकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, महिला वाहकाचा पाठलाग करणाऱ्या आणि या डेपो मॅनेजरविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदत मागण्यासाठी आलेल्या तरुणीला केले प्रपोज : DySp वर गुन्हा दाखल
या डेपो मॅनेजरने याआधीही महिलेला त्रास दिला आहे. विशेष म्हणजे पीडित महिला वाहकाला त्रास देण्याच्या या कामात आणखी एक वाहक आणि चालक डेपो मॅनेजरची मदत करत होते. यातील वाहक हा मानसिक त्रास देत होता. फोटो व्हायरल करण्याचा त्रास द्यायचा आणि पाठलागही करायचा.
या प्रकरणी संबंधित महिला वाहकाने महिला आयोग आणि पोलिसांत तक्रार दिली होती. वरिष्ठांकडेही वेळोवेळी तक्रार केली होती. त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे महिला वाहकाने पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठांकडे डेपो मॅनेजरची तक्रार केल्यानंतर महिला कर्मचाऱ्यालाच निलंबित करण्यात आले.
महिला वाहकाने दिलेल्या तक्रारीनुसार डेपो मॅनेजर तिला अनेक वर्षांपासून त्रास देत होता. उशिरा सुटणाऱ्या गाड्या देणे, कठीण स्वरुपाची ड्युटी लावणे असा त्रास देत होता. इतकेच नाही तर तोंडाला रुमाल बांधून हा डेपो मॅनेजर पाठलाग देखील करायचा. पाठलाग करत शरीरसुखाची मागणी करायचा. पुण्यातील परिवहन विभागात घडलेल्या या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलीस तसेच पुणे परिवहन विभागाचे अधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.