Tukaram Munde Rain In Bhivandi : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूच्या ‘मृत्यू तांडवा’नंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अवघ्या 30 रुपयांच्या गावठी दारूने 18 जणांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच, या नरसंहाराला कारणीभूत ठरलेल्या विषारी ‘मिथेनॉल’चा पुरवठा करणाऱ्या मुख्य केंद्राचा एफडीएने पर्दाफाश केला आहे. एफडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हा विषारी साठा राज्याच्या इतर भागांत जाऊन आणखी मोठे अनर्थ घडवू नये, म्हणून एफडीएने संपूर्ण साठा तात्काळ जप्त केला आहे. आरोपींविरोधात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपनीचा परवाना कायमचा रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
धाडीत 5,929 मिथेनॉलचा साठा जप्त
तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानंतर भिवंडीतील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीवर छापा टाकून तब्बल 5,929 किलोग्रॅम मिथेनॉलचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या या रॅकेटचे थेट धागेदोरे पुण्याच्या विषारी दारूकांडाशी जोडले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, प्रशासनाने या कंपनीचे गाळे सील करत परवाना रद्द करण्याची आक्रमक कारवाई सुरू केली आहे.
18 जणांचा बळी घेणारे विष आले कुठून? पोलिसांच्या तपासात उघड
पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात ज्या 18 नागरिकांनी प्राण गमावले, त्यांनी कर्नालसिंग विरका याच्या घरातून हातभट्टीची दारू पिली होती. विरकाने ही दारू योगेश वानखेडेकडून घेतली आणि योगेशने ती उरळी कांचन येथील राजू प्रजापतीकडून आणली होती. मात्र, या दारूत ‘मिथेनॉल’ नावाचे जीवघेणे रसायन मिसळणारा मुख्य सूत्रधार भिवंडीतील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ कंपनी असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे. हे पाशवी कनेक्शन समोर येताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेकंदाचाही विलंब न लावता औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक भिवंडीतील वळगाव येथील ‘अनंत अँड कंपनी’च्या गोदामावर (गाळा नंबर ५४४/ए) धाडले.
Liquor Poisoning : पुण्यात विषारी दारूने मृत्युचं तांडव; मिथनॉल शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं?
ना खरेदीची नोंद, ना विक्रीचा हिशोब
एफडीएच्या पथकाने जेव्हा म्हात्रे कंपाउंडमधील गोदामावर छापा टाकला, तेव्हा तिथे मृत्यूचे मोठे घबाडच हाती लागले. गोदामात तब्बल 5,929 किलो मिथेनॉल कोणतीही अधिकृत नोंद नसताना दडवून ठेवण्यात आले होते. छाप्यावेळी कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि अभिषेक चौबे उपस्थित नव्हते चौकशी केली असता त्यांना आधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.
पुढील मोठा अनर्थ टळला; राज्यात इतरत्र शोध सुरू
आयुक्त मुंढे यांच्या समयसूचकतेमुळे भिवंडीतील हा साठा जप्त झाला आहे. अन्यथा पुण्यासारख्या भीषण मृत्यू तांडवाची पुनरावृत्ती राज्याच्या इतर भागातही झाली असती. या कारवाईमुळे अवैध दारू माफिया आणि रासायनिक कंपन्यांच्या अभद्र युतीचे ‘पितळ’ उघडे पडले आहे. आता राज्यातील इतर भागातही अशा प्रकारे बेकायदेशीर रसायनांचा पुरवठा होतो का, याची कसून तपासणी सुरू झाली आहे.
Exclusive : मला दवाखान्यात न्या हो..फुगेवाडीत 9 जणांचा मृत्यू .. प्रकृती बिघडलेल्या तरुणाची आर्त हाक
तक्रार करा, नाव गोपनीय राहणार
अवैध औषध विक्री, रसायनांची भेसळ किंवा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी एफडीए लवकरच नवीन मोबाईल ॲप आणि टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करत आहे. औषधांच्या दर्जाबद्दल शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास आपले नाव, पत्ता आणि संशयित दुकानाचा/कंपनीचा पत्ता स्पष्ट लिहून एफडीएकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाईल आणि तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
