पुणे : पुण्यातील दोन विद्यार्थांनी सातासमुद्रापार संपन्न झालेल्या येल विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी मॉडेल युनायटेड नेशन्स (YMUN 50) या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिरूप परिषदेत “सर्वोत्कृष्ट सादरीकरण व्यवस्थापन”आणि “उत्साही वक्ता” म्हणून कामगिरी बजावत भारताची शान वाढवली आहे. रिदम मुथा आणि सफल मुथा असे या दोन विद्यार्थांची नावं आहेत. सफल हा पुण्यातील कॅम्प परिसरातील ‘द बिशप्स हायस्कूलचा विद्यार्थी आहे तर, रिदम ही चिंचवड येथील प्राईड स्कूलची विद्यार्थिनी आहे.
अमेरिकेमधील न्यू हेवन येथे 18 ते 21 जानेवारी दरम्यान ही परिषद संपन्न झाली होती. या परिषदेसाठी रिदम आणि सफल मुथा या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या परिषदेत सफलने इटलीचे तर रिदमने पॅराग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. सफलने परिषदेत सादरीकरण करताना विकसनशील देशांमधील स्थलांतरित महिलांचे शोषण आणि माता मृत्यू यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. तर, बैठकीत चर्चा, वादविवाद, भाषणे आणि ठराव तयार करण्यात रिदमने मोलाचा सहभाग नोंदवला.
या प्रतिरूप परिषदेसाठी 45 हून अधिक देशांमधून दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सफलने “सर्वोत्कृष्ट सादरीकरण व्यवस्थापन” साठी तर रिदमने “उत्साही वक्ता” म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात संयुक्त राष्ट्र संघाचे माजी महासचिव बान की-मून यांची उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. उद्घाटन समारंभात माजी संयुक्त राष्ट्र महासचिवांना ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचा भावना सफल मुथाने व्यक्त केल्या. तर रिदम हिने सांगितले की, वक्तृत्व, वादविवाद आणि चर्चेदरम्यान वाटाघाटी यामधील आमच्या कौशल्यांचा तिथे गौरव झाला, याचा आनंद झाल्याचे म्हटले आहे.