पुरंदरात राडा! आंदोलक शेतकरी अन् पोलिसांत धुमश्चक्री; लाठीचार्ज, धक्काबुक्कीत महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा

पुरंदर विमानतळासाठी जमिनी देण्यास सात गावांतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. विमानतळाच्या ड्रोन सर्वेलाही ग्रामस्थांचा विरोध आहे.

Purandar News

Purandar News

Pune News : पुणे जिल्ह्यातील पुरंदरमधून एक (Pune News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुरंदर विमानतळासाठी जमिनी देण्यास सात गावांतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. विमानतळाच्या ड्रोन सर्वेलाही ग्रामस्थांचा विरोध आहे. प्रशासन मात्र सर्वेवर ठाम आहे. जमिनीचे मोजमाप आणि सर्वे करण्यासाठी प्रशासनाचे एक पथक कुंभारवळण गावात दाखल झाले होते. परंतु, ग्रामस्थांनी पथकाला गावात जाण्यास विरोध केला. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच गदारोळात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आता राजकारणही सुरू झाले आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. याच लाठीचार्जमध्ये एक महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र प्रशासनाने याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

या लाठीचार्जनंतर मात्र गावकरी चांगलेच संतप्त झाले होते. यानंतर प्रशासन आणि पोलीस कर्मचारी गावातून माघारी गेले. या गदारोळात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्येच ठेवणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गावकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका वाद काय?

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात प्रस्तावित विमानतळाला जोरदार विरोध होत आहे. याला विरोध करण्यासाठी आज ग्रामस्थ एकत्र आले होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी पोलीस आणि गावकऱ्यांत काही काळ वादावादी झाल्याचीही माहिती आहे. धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमचा जीव गेला तरी चालेल पण विमानतळाला आमचा विरोध राहणारच अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

वाढत्या उन्हाचा पुणे शहराला फटका; मनपाकडून पाणी कपातीचा निर्णय, कोणत्या भागात कपात?

Exit mobile version