Raj Thackeray : काही दिवसांवर आलेल्या आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यातील मनसेच्या शहर कार्यालयात आज (ता.4 जून बुधवार )एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस शहरातील स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यात आला असून, पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation Election) सर्व जागांवर मनसे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या निवडणुकीत मनसे स्वबळावर उतरणार असल्याचे समजते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या 9 जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, ते शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहर संघटनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. दरम्यान,पुण्यातील सर्व शाखाप्रमुखांना बदलण्याची शक्यता आहे.
यासोबतच गटप्रमुखांच्या देखील नव्या निवडी करण्यात येणार आहेत. शाखाप्रमुख व गटप्रमुख यांच्यावर कार्यक्षमतेने लक्ष ठेवण्यासाठी नवीन पदाची निर्मिती केली जाणार असून, त्या अंतर्गत नवीन नियुक्त्याही जाहीर होतील.
लक्ष्मण हाकेंनी 5 वर्षाचा पगार दिला नाही, ड्रायव्हरचा गंभीर आरोप
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात काय समीकरण नव्याने जुळतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.