पुणे विमानतळावर प्रवाशांची लूट? 375 रुपयांचा प्रवास पडला 650 रुपयांना; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

साधारण 350 ते 375 रुपयांचा प्रवास विमानतळाच्या गेटवरून टॅक्सी घेतल्यामुळे 650 रुपयांना पडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Untitled Design   2026 09 02T210336.811

Untitled Design 2026 09 02T210336.811

Raju Shetti’s serious allegation : पुणे विमानतळावरून टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. दिल्लीहून मध्यरात्री पुणे विमानतळावर आल्यानंतर स्वतःला आलेला अनुभव सांगत त्यांनी विमानतळावरील टॅक्सी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. साधारण 350 ते 375 रुपयांचा प्रवास विमानतळाच्या गेटवरून टॅक्सी घेतल्यामुळे 650 रुपयांना पडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुण्यातील संत तुकाराम महाराज लोहगाव विमानतळावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. विमानतळावर उतरल्यानंतर ओला, उबर किंवा अन्य टॅक्सी सेवांच्या वाहनांनी थेट गेटवरून प्रवासी पिकअप केल्यास प्रत्येक वाहनामागे सुमारे 200 ते 300 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, ते रात्री दोनच्या सुमारास दिल्लीहून पुणे विमानतळावर पोहोचले. पुणे विमानतळ ते शासकीय विश्रामगृह या प्रवासासाठी ऑनलाइन भाडे सुमारे 350 ते 375 रुपये दाखवत होते. मात्र, विमानतळाच्या गेटवरून टॅक्सी पिकअप केल्यास त्यासाठी 650 रुपये आकारण्यात आले. हे अतिरिक्त शुल्क टाळायचे असल्यास प्रवाशांना विमानतळापासून जवळपास 600 मीटर अंतरावर असलेल्या एरोमॉलपर्यंत जावे लागते, असेही त्यांनी सांगितले.

 

बॅगा घेऊन 600 मीटर चालणार कसे?

विमान प्रवाशांकडे बॅगा आणि इतर साहित्य असल्याने त्यांना 600 मीटर चालत एरोमॉलपर्यंत जाणे सहज शक्य नसते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसोबत असलेली कुटुंबे आणि अधिक सामान असलेल्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. या परिस्थितीचा फायदा घेत प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

650 रुपयांच्या भाड्यात टॅक्सीचालकाच्या हाती किती?

या व्यवस्थेमुळे प्रवाशांसोबतच टॅक्सीचालकांचेही नुकसान होत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, 650 रुपयांच्या एकूण भाड्यात सुमारे 375 रुपये मूळ कंपनी भाडे, तर 275 रुपये टर्मिनलशी संबंधित शुल्क होते. त्यानंतर 375 रुपयांमधून ओला, उबर किंवा अन्य कंपन्या सुमारे 25 ते 30 टक्के कमिशन कापतात. त्यामुळे टॅक्सी मालकाच्या हातात सुमारे 250 ते 275 रुपये राहतात. त्यातून पेट्रोल किंवा डिझेलचा 80 ते 100 रुपयांचा खर्च तसेच वाहनाचा मेंटेनन्स, कर्जाचा हप्ता आणि इतर खर्च भागवावे लागतात. एवढ्या कमी उत्पन्नात रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या टॅक्सीचालकाला व्यवसाय कसा परवडणार, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

 

‘दररोज 12 ते 15 लाख रुपयांचा प्रवाशांना फटका’

पुणे विमानतळावर दररोज सरासरी पाच ते सात हजार वाहनांमधून प्रवाशांना पिकअप केले जात असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला. त्यानुसार अतिरिक्त शुल्काचा हिशेब केल्यास दररोज सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचा आर्थिक भार प्रवाशांच्या खिशावर पडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकीकडे प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क घेतले जाते, तर दुसरीकडे टॅक्सी कंपन्यांकडून चालकांच्या भाड्यातून कमिशन कापले जाते. त्यामुळे प्रवासी आणि टॅक्सीचालक या दोघांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

या कंत्राटांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचे हितसंबंध असल्याचाही गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मतदारसंघातील विमानतळावरच अशी परिस्थिती असेल, तर देशभरातील विमानतळांवरील परिस्थितीचाही विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेवर कठोर शब्दांत टीका केली.

Exit mobile version