राणा सूर्यवंशी चौकशीपूर्वीच रुबी हॉलमधून फरार, तीन मित्रांचाही शोध सुरू; प्रकरणात आता नवं वळण

बारामतीतील कथित हल्ल्याचा बनाव उघड झाल्यानंतर राणा सूर्यवंशीच्या फरारीमुळं तपासात नवा पेच निर्माण झाला आहे.

News Photo   2026 10 25T182336.650

Rana Suryavanshi

Rana Suryavanshi :  बारामती विमानतळ परिसरात (Rana) आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार करणाऱ्या राणा सूर्यवंशी याच्याच कटाचा हा प्रकार असल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत असून, पुढील चौकशीसाठी पोलीस पोहोचण्यापूर्वीच राणा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून फरार झाला आहे. त्याच्यासोबत या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीन मित्रांचाही पोलीस शोध घेत आहेत. राणा शिपिंग कंपनीचा चालक आणि व्यावसायिक असलेल्या राणाच्या फरारीमुळं तपासाला नवं वळण मिळालं आहे.

रविवार, 18 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता बारामती विमानतळाजवळील पालखी महामार्गावर पायलट ढाब्याच्या परिसरात आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार राणा यानं बारामती पोलिसांकडे केली होती. गोजुबावी परिसरात तो उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्यानं जवळ येत पिस्तूल दाखवलं आणि लोखंडी सत्तूरानं वार केले, असा दावा त्यानं केला होता. या हल्ल्यात उजव्या हाताच्या दंडावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

या घटनेची माहिती मिळताच बारामती उपविभागीय पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी करताना पोलिसांना अनेक विसंगती आढळल्या. त्यानंतर केलेल्या तपासात हा हल्ला प्रत्यक्षात घडला नसून, स्वतःवर हल्ला घडवून आणल्याचा बनाव असल्याचं समोर आलं. पोलीस संरक्षण मिळवणं किंवा अन्य वैयक्तिक स्वार्थ साधणं हा या कटामागील उद्देश असू शकतो, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Letsupp Exclusive : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात तीन मित्रांनीच दिली सुपारी; सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात राणाच्या जवळच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तिघांची चौकशी सुरू असून, कथित हल्ल्याचा कट रचण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय या प्रकरणात आणखी तीन मित्र सहभागी असल्याचा संशय असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत. या सर्वांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे.

दरम्यान, राणाला रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतरही त्याच्याभोवती खासगी सुरक्षा रक्षकांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, राणा याचे रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी जवळचे संबंध आहेत. गडचिरोली जिल्ह्यात रुबी हॉलची नवीन शाखा सुरू करण्याच्या कामातही त्यानं मध्यस्थी केल्याचं सांगितलं जात आहे. या संबंधांमुळं रुग्णालयातील त्याचा वावर आणि प्रभाव याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या संबंधांवरून कोणताही गैरप्रकार झाल्याचं स्वतंत्रपणे सिद्ध होत नाही.

हल्ल्याचा बनाव उघड झाल्यानंतर राणाची सखोल चौकशी करण्यासाठी बारामती पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाला कळवलं होतं. मात्र, पोलीस पथक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तो तेथून निघून गेल्याचं समोर आलं आहे. त्याच्या साथीदारांची चौकशी सुरू असताना आणि पुढील कारवाईची तयारी सुरू असतानाच तो फरार झाल्यानं पोलिसांसमोर त्याला शोधण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. सध्या राणा सूर्यवंशी आणि त्याच्या संपर्कातील फरार तीन मित्रांचा शोध सुरू असून, या प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येते याकडं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version