अमोल जायभाये, प्रतिनिधी
Pune Teacher Constituency Election-विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील भाजप (BJP), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना या तीनही पक्षांनी दावा केला होता. मात्र आता ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याची माहिती आहे. मात्र, महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. शिवसेनेकडून मंगेश चिवटे (Mangesh Chivate) आणि सचिन सानप (Sachin Sanap) हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पाच तारखेला अर्ज दाखल करणार असल्याचे सचिन सानप यांनी जाहीर केले आहे, तर मंगेश चिवटे सहा तारखेला अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे महायुतीत मोठी बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जयंत आजगावकर यांना उमेदवारी मिळाली आहे, पुणे पदवीधरावरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही मंथन सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, भाजपने शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या सर्व मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय निवडणूक समितीला पाठवली आहे. त्यामुळे रविवारी किंवा सोमवारी भाजपची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
