Download App

Chinchwad byelections : कलाटेंवर कारवाई आम्ही करायची की राष्ट्रवादीने.. अहिर असे का बोलले?

पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad byelections) जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे (Nana Kate NCP) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

दरम्यान, काटे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी विनंती करून आणि उद्धव ठाकरे यांनी फोन करून देखील कलाटेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं अहिर यांनी म्हटलं आहे. त्यांनी नुकताच पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

आहेर म्हणाले, आज तीन वाजेपर्यंत कलाटे यांना माघार घेण्यास आम्ही सांगत होतो. मात्र तीन वाजल्यानंतर देखील त्यांनी माघार न घेतल्यामुळे पक्ष त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे. मात्र, ही कारवाई आम्ही केली पाहिजे की राष्ट्रवादीने केली पाहिजे हा खरा तर संशोधनाचा भाग आहे, असं अहिर म्हणाले. दरम्यान आहेर असे का म्हणाले, याची चर्चा मात्र जोरदार रंगत आहे.

पुढे बोलताना अहिर म्हणाले की, आज आम्ही चिंचवडमध्ये अतिशय जोरदार मेळावा घेतला. त्यामध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जे काही पाच दहा टक्के कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक हजर नव्हते त्यांनी देखील गैरहजर राहण्याचे कारणं दिलेली आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या मेळाव्यात झाल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले.

चिंचवडमध्ये बंडखोरी झाल्यानंतर कसब्यात देखील शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यात जोरदार वाद झाल्याच्या काही बातम्या समोर आल्या होत्या. हा वाद इतका टोकाला गेला होता की धनवडे यांनी राजीनामा देण्याची देखील तयारी दर्शवली होती. यावरही अहिर यांनी प्रतिक्रिया दिली.

एका बाजूला संजय मोरे आणि दुसऱ्या बाजूला विशाल धनवडे यांना घेऊनच अहिर यांनी ‘माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाहिलं तर कसब्यामध्ये कोण नाराज आहे आणि कोण नाही हे लगेच समजून जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, अनेक वेळा नाराजीचा अर्थ काही लोक वेगळा काढतात. संपर्कप्रमुख असून माझ्या पक्षाला एकही जागा लढवता आली नाही म्हणून मी देखील नाराज आहे. जर भाजपच्या दोन्ही जागेवर आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल तर आम्ही यापुढे आमी कुठे उमेदवारी मागची ?, मी चेतन तुपे आणि सुनील शेळके यांना देखील हेच विचारलं. जिकडे भाजपचे आमदार होते तिकडेच उमेदवारी मागण्याची आमची अपेक्षा होती. पण महाविकास आघाडी म्हणून भाजपला दूर ठेवण्याचा निर्णय झाला.

आम्हाला आणि आमच्या शिवसेना पक्षाला संपावण्याची भाषा ज्या भाजपने केली. आमच्या पक्षात फूट पाडून चिन्ह गोठवण्याचा प्रकार करणाऱ्या पक्षाला हरवण्यासाठी दोन पावलं मागे घेण्याची भूमिका आम्ही घेतली असेल, तर त्याला आमचा पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीला निवडून आणण्यासाठी निर्धाराने आम्ही उतरलो आहे, असंही अहिर यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us