MBA Paper Leak : सरकारी सेवेत जाण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे पेपर लीक (Paper leak) झाल्याच्या घटना राज्यात सातत्याने समोर येत असतात. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागतर्फे घेतल्या जाणाऱ्या एमबीए प्रथम वर्षाचा लीगल अॅस्पेक्ट्स ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका फुटली. परिक्षा सुरू होण्याआधीच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. चिखली येथील डी.वाय.पाटील महाविद्यालयातून (DY Patil College) ही प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पेपर फुटल्याचं लक्षात येताच विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या पेपरफुटीच्या प्रकारामुळं विद्यापीठ वर्तुळाच चांगलीच खळबळ उडाली.
काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा
प्राप्त माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयांतील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. सध्या विद्यापीठाची हिवाळी परीक्षा (ऑक्टोबर 2023) सुरू आहे. ही परीक्षा 21 नोव्हेंबरपासून सुरू झाली. तर एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा 11 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. आज (22 डिसेंबर रोजी) एमबीए फर्स्ट सेमिस्टरचा लीगल अॅस्पेक्ट्स ऑफ बिझनेस या विषयाची पेपर होता. सकाळी 11 वाजता हा पेपर सुरू होणार होता. मात्र त्यापूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. चिखली येथील डी.वाय.पाटील महाविद्यालयातून या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ram Shinde : आमच्या घरात काय चाललंय ते पाहण्यापेक्षा स्वतःच पाहा…राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला
दरम्यान, पेपरफुटीची घटना लक्षात येताच विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द झालेला पेपर आता 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार असल्याचे सांगण्यात आले.
पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना पूर्णत: अयशस्वी ठरत असल्याचं या प्रकारावरून लक्षात येत आहे. त्यामुळं असे गैरप्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.
या पेपरफुटीच्या प्रकाराविषयी बोलतांना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांना सांगितले की, सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.