Supriya Sule on Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीर अजूनही फरार आहे. या प्रकरणात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मलाही हगवणे कुटुंबाने एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. पण मी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
खासदार सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. सुळे म्हणाल्या, पुण्यातील हे प्रकरण अतिशय खेदजनक आहे. समाज म्हणून आपल्यासाठी सुद्धा ही घटना अतिशय लाजिरवाणी आहे. मी कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की हुंड्याच्या विरोधात कठोर कायदा केला पाहिजे. जो कुणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
“वैष्णवी-शशांकचं लव्ह मॅरेज, लग्नाला गेलो यात काय चूक? दोषी असेल तर..”, अजितदादांनी मांडली भूमिका
एकाच कुटुंबातील दोन सुना जर पोलिसांत जाऊन तक्रार करत असतील तर मग इतकं शिक्षण घेऊन हगवणे कुटुंबाने काय केलं? पाश्चात्य कपडे घालूनही बुरसटलेले विचार गेलेले नसतील तर काय उपयोग? असे सवाल सुळे यांनी उपस्थित केले. पुरोगामी विचारांचं पालन हगवणे कुटुंबानं केलं नाही अशी खंत सुळे यांनी व्यक्त केली. माझ्याच मतदारसंघात हगवणे कुटुंब येते.
एक महिनाभरापूर्वी त्यांच्या घरात एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे आमंत्रण मलाही त्यांनी दिले होते. परंतु, या घरातील सूनांनी पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती मला होती. त्यामुळे या कार्यक्रमाला जाणं मी टाळलं असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी अजित पवारही गेले नव्हते. मात्र लग्नाला नक्कीच गेले होते. पण तेव्हा हगवणे कुटुंबाबाबत त्यांना माहिती नसावी, असेही सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत येत्या 26 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र, दीर सुशील अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस (Pune Police) प्रयत्न करत आहेत.
वैष्णवी हगवणेंचं बाळ सुखरूप, वैष्णवीच्या आई-वडिलांकडे करणार सुपूर्द; पडद्यामागे काय घडलं?