पुणे : हवामान खात्यानं दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या आजच्या दौऱ्यात ते शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण करणार होते. मात्र, हा दौराच रद्द करण्यात आला असून, मोदींचा दौरा रद्द झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान कार्यालयाकडे मोठी मागणी केली आहे. आता सुळे यांच्या या मागणीवर PMO काय निर्णय घेतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द झाल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पावसामुळे मोदींचा नियोजित दौरा रद्द झाला याबद्दल खरचं वाईट वाटलं. पण जरी त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझी पंतप्रधान कार्यालयाला विनंती आहे की, त्यांनी शिवाजी नगर ते स्वारगेट तयार झालेल्या मेट्रो मार्ग लवकरात लवकर सुरू करावा. केवळ उद्घाटनासाठी म्हणून तयार झालेला हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या वापरासाठी थांबवून ठेऊ नये.
कसा होता PM मोदींचा पुणे दौरा?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते. त्यानंतर ते शिवाजीनगर स्थानकावर येऊन मेट्रोने शिवाजीनगर ते स्वारगटे असा प्रवास करणार होते. भुयारी मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मोदी वाहनाने स.प महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होणार होते. येथे मोदींची जाहीर सभा पार पडणार होती.
#WATCH | On PM Modi's visit to Pune being cancelled due to heavy rain situation in the city, NCP-SCP MP Supriya Sule says, "I am very saddened that due to the rain situation, he could not come to Pune. I request the PMO to open it as soon as possible because the metro should not… pic.twitter.com/UCqXrhFb6O
— ANI (@ANI) September 26, 2024
मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्यात मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. तसेच मोदी भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.