Download App

पुणे अपघात प्रकरणात अंधारेंचा मोठा दावा; म्हणाल्या, डॉ. तावरेंना सहाव्या मजल्याचं संरक्षण

पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Pune Accident Sushma Andhare: पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या जीविताला धोका आहे असं म्हणत 4 जूनला लोकसभा निकालानंतर मोठे गौप्यस्फोट करणार असा इशाराच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं

या प्रकरणात अनेक मोठे प्रस्थ गुंतले आहेत. 12 तासाच्या आत जामीन मिळाला, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या झाल्या. रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, आरोपील वा्चवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ तर आहेच अशी टिकाही त्यांनी केली आहे. पण या सगळ्या संबंधाने विचार केला तर निश्चितच तावरेंच्या जीवाला धोका आहे. अजय तावरे हा रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. तर, गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा खळबळजनक दावाच सुषमा अंधारेंनी केला आहे.

धक्कादायक खुलासे करणार

सुषमा अंधारे म्हणाल्या, मी एक एक्स (ट्विटर)वर पोस्ट केली आहे, जे बोलायचं आहे ते 4 जून नंतरच बोलेन. सध्या पोलिसांवर बराच ताण आहे, त्यांच्यावर अधिकचा ताण वाढवायचा नाही. त्यामुळं चार जून नंतरच मी त्या पोस्टवर बोलेन असं अंधारे म्हणाल्या आहेत. डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर यांच्या जीवाला धोका असू शकतो, पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यायला हवं, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. आर्यन खान आणि सिंघानिया प्रकरण असो की नवाब मलिक प्रकरण असो या प्रकरणातील जे व्हिटनेस आहेत. त्यांच्यासोबत काय घडलं याची सर्वांना कल्पना आहे असा संदर्भही अंधारे यांनी यावेळी दिला आहे. सध्या डॉ. तावरे पोर्शे कार अपघात प्रकरणात महत्वाचे विटनेस आहेत. त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे.

ब्लर केलेले चेहरे कुणाचे?

सुषमा अंधारेंचा सवाल सुनील टिंगरे खोटं बोलले, शिफारस पत्राने हे सिद्ध झालं. खुलासा देण्याची वेळ सुनील टिंगरेंवर का आली? नेहमी एका आमदारांची चर्चा या प्रकरणात होते. पबमधील व्हिडीओ समोर आला. त्यात काही चेहरे ब्लर केले आहेत. ते ब्लर चेहरे कुणाचे आहेत याची माहिती समोर आली पाहिजे अशी नवीन मागणीही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली आहे.

गृहमंत्री पद माझ्याकडे द्या

राज्याचे गृहमंत्री कायम विरोधकांनी राजकारण करू नये असं सांगत असतात. त्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वेळ का घालवता? पोर्शे अपघात प्रकरणी इथं येऊन का खुलासा करत नाही? विरोधकांनी काय करावं यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी काय करावं हे त्यांनी सांगावं असा प्रतिप्रश्न अंधारे यांनी केला आहे. तसंच, गृहमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे द्या, मी तावरेंशी कोण-कोण बोललं हे समोर काढते असं आव्हानही त्यांनी फडणवीस यांना दिलं आहे.

follow us