The competition for war has increased in the country : आज संपूर्ण जगात अशांतता पसरली आहे. बॉम्बस्फोट, दंगली आणि आतंकवाद दिवसेंदिवस वाढत चालला असून साम्राज्यवादी देशात युद्धाची स्पर्धा अधिकच वाढली आहे. युद्ध आणि आतंकवाद हे कोणत्याही समस्येवर उपाय नाही. अहिंसा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. असं मत शक्तिमान, महाभारत आणि भीष्म पितामह फेम प्रसिद्ध सिनेअभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी व्यक्त केलं. एमआयटी (MIT) विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे आयोजित 30 व्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्चचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू, यशदा आयएस अकॅडमीचे संचालक रंगनाथ नाईकडे, डॉ. बी. एस. नागोबा, दूरदर्शनचे (Doordarshan) माजी कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश शर्मा, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ. दिपेंद्र शर्मा, डॉ. भरत चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे होते.
मुकेश खन्ना म्हणाले, आजची मुलं ही उद्याचं भविष्य आहे. मोबाईलच्या आभासी जगात हीच मुलं खूप गुंतलेली दिसतात. त्यामुळे ती अधिक अस्वस्थ आहेत. मोबाईलच्या अतिवापरापासून त्यांना दूर ठेवणं म्हणजे मोठं आव्हानचं आहे. त्यासाठी नैतिकतेची शिकवण देणारी संस्कृतची शिक्षण व्यवस्था (Education System) आणायला हवी. रंगनाथ नाईकडे म्हणाले की, संतांचे विचारच आज विश्वबंधुत्वाचे बीज पेरू शकतात. आज लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये संत साहित्य रुजवण्याची गरज असून योगा, मेडिटेशन आणि अध्यात्मामुळेच आजची मुलं सक्षम होतील. उत्तुंग ध्येयाची भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हाच पर्याय आहे.
IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार; 5 सामन्यांच्या टी20 मालिकेची घोषणा
डॉ. अरविंद नातू म्हणाले की विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान मानवी आरोग्यासाठी कृत्रिम औषधोपचार देतं. तर अध्यात्म हे मेडिटेशन, योगा आणि ध्यान धारणेच्या माध्यमातून प्राकृतिक आरोग्य उपचार देतं. अलीकडे लोकांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलंय. सामाजिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्म हाच एकमेव पर्याय आहे. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की विश्वशांतीसाठी काम करणाऱ्या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते. ज्ञानोबा तुकोबांचा संपूर्ण जगाला जोडणारा विचार हाच आजच्या विनाशकारी जगात एक आशेचा किरण आहे. केवळ विश्व मानवताच जगात शांती आणू शकते. आपण सर्वजण या मार्गाचे पाईक होऊया. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन गाडेकर यांनी केले तर डॉ. मिलिंद पात्रे यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले.
