काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा (Balan) करणाऱ्या कार्यकर्त्यांना दहशतवादी संघटनांकडून धमक्या मिळाल्यानंतरही उत्सवाचा उत्साह कायम आहे. जीवाची पर्वा न करता यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार काश्मीरमधील गणेश मंडळांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्या मूर्तींची विधिवत पूजा करून त्या काश्मीरमधील मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
काश्मीरमधील लाल चौकात तब्बल 34 वर्षांनंतर 2022 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा सुरुवात झाली होती. त्यानंतर सलग 3 वर्षे खोऱ्यातील विविध भागांत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा काश्मीरमधील 4 ते 5 जिल्ह्यांत सार्वजनिक गणेशोत्सव व्यापक स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही धमक्यांना न घाबरता उत्सव साजरा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार; तरुणाईचा जनसागर उसळला
काश्मीरमधील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात येऊन गणेशमूर्ती स्वीकारल्या. यावेळी मोहित भान, रिषभ चाकू, शिशंत चाकू, संदीप रैना, संजीव रैना, हितेश रैना आणि संदीप कौल उपस्थित होते. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार आणि अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात यावेळी उपस्थित होते.
काश्मीरमधील कार्यकर्त्यांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या धाडसाचे पुनीत बालन यांनी कौतुक केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणेशोत्सव साजरा करण्याची त्यांची भूमिका निश्चितच वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांनी आणि पुनीत बालन यांनी सलग 5 व्या वर्षी काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला असून, या उपक्रमातून काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सवाची परंपरा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
