Vishwambhar Chaudhari’s post about Vidyanand Bapat : डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. विद्यानंद बापट यांनी आता बोलणं थांबवण्याची गरज असल्याचं सांगतानाच काही पत्रकार जाणीवपूर्वक त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यं करून घेत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. या सगळ्या वादात मूळ डीजेचा मुद्दा मागे पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
विश्वंभर चौधरी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. विद्यानंद बापट यांनी आता बोलणं थांबवण्याची गरज आहे. काळाच्या शंभर वर्ष पुढे विचार करणारा माणूस आहे पण हिंसक बोलून घेऊन त्याची वाट लावण्याच्या मागावर अनेक पत्रकार आहेत, असं चौधरी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. मीडिया आपल्यामागे पापाराझ्झीप्रमाणे लागल्याची तक्रार खुद्द विद्यानंद बापट करत असल्याचा उल्लेखही चौधरी यांनी केला. मात्र माध्यमांशी किती बोलायचं आणि कुठे थांबायचं, याचा निर्णय बापट यांनीच घेण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मंत्र्यांच्या स्वागतासाठी हार घेऊन गेला अन् नेत्याची 7 लाखांची सोन्याची साखळी गायब, व्हिडिओ व्हायरल
याच पोस्टमधून चौधरी यांनी काही पत्रकारांवर गंभीर आरोप केले आहेत. काही पत्रकार मुद्दाम त्याच्यांकडून अशी वाक्य बोलून घेत आहेत ज्याद्वारे हिंसा, धार्मिक तेढ, जातीय तेढ निर्माण झाली तर ती त्यांना पाहिजे आहे. मग डीजेचा मुद्दा आपोआप मागे पडतो, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. विद्यानंद बापट यांनी डीजे आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात मांडलेल्या भूमिकेनंतर त्यांची विविध माध्यमांमधून मुलाखत घेतली जात आहे. त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरूनही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी बापट यांना बोलण्याबाबत संयम ठेवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.
या संपूर्ण पोस्टमधील चौधरींचा मुख्य भर मात्र डीजेच्या मूळ मुद्द्यावर आहे. इतर वक्तव्यांमुळे निर्माण होणाऱ्या वादात ध्वनी प्रदूषणाचा विषय बाजूला पडू नये, अशी त्यांची भूमिका आहे. डीजेचा मुद्दा मागे पडायला नको, असं म्हणत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला आहे. विद्यानंद बापट यांच्या वक्तव्यांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विश्वंभर चौधरी यांनी केलेली ही पोस्ट आता लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे बापट यांच्या विचारांचं कौतुक करतानाच दुसरीकडे त्यांनी माध्यमांशी किती आणि कसं बोलावं, याबाबत चौधरी यांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.
