पुणेकरांच्या ताटात पोषणाचा अभाव! 81 टक्के पुरुषांमध्ये बी-12 ची कमतरता; KEM रिपोर्ट

Vitamin B12 Deficiency In Pune Resident व्हिटॅमिन बी-12च्या कमतरतेची समस्या पुण्यात गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

KEM Hospital Study On Vitamin B12

KEM Hospital Study On Vitamin B12

KEM Hospital Study On Vitamin B12 Deficiency In Pune Resident : शरीराच्या योग्य कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या व्हिटॅमिन बी-12च्या कमतरतेची समस्या पुण्यात गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. पुण्यातील शहरी मध्यमवर्गीय पुरुषांपैकी तब्बल 81 टक्के जणांमध्ये व्हिटॅमिन बी-12ची पातळी कमी असल्याचे केईएम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संशोधनात आढळले आहे. विशेष म्हणजे, शाकाहारी आहार घेणाऱ्या पुरुषांमध्ये मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत बी-12च्या कमतरतेचा धोका तब्बल 4.4 पट अधिक असल्याचेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. केईएम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संशोधनाच्या आधारावर लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.

प्रकाशित वृत्तानुसार, केईएम हॉस्पिटलच्या डायबिटीज युनिटकडून 1995 पासून व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेविषयी संशोधन सुरू आहे. या दीर्घकालीन अभ्यासात पुण्यातील ग्रामीण भाग, झोपडपट्टी आणि शहरी मध्यमवर्गीय अशा विविध सामाजिक गटांतील हजारो नागरिकांच्या आरोग्यविषयक चाचण्या करण्यात आल्या. या संशोधनातील निष्कर्षांनुसार, शहरी मध्यमवर्गीय पुरुषांमध्ये बी-12ची कमतरता सर्वाधिक आढळली आहे.

शहरी मध्यमवर्गीयांमध्ये कमतरतेचे प्रमाण सर्वाधिक

संशोधनात सहभागी पुरुषांपैकी एकूण 67 टक्के जणांमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची पातळी कमी असल्याचे आढळले. मात्र, सामाजिक गटानुसार या प्रमाणात लक्षणीय फरक दिसून आला. शहरी मध्यमवर्गीय पुरुषांमध्ये हे प्रमाण 81 टक्के, ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये 68 टक्के, तर झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये 51 टक्के होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत समजल्या जाणाऱ्या शहरी मध्यमवर्गीयांमध्येही आहारातील पोषणमूल्यांचा अभाव असल्याचे अधोरेखित झाले आहे.

शाकाहारी आहारामुळे धोका 4.4 पट अधिक

व्हिटॅमिन बी-12चा नैसर्गिक स्रोत प्रामुख्याने प्राणिजन्य पदार्थांमध्ये आढळतो. त्यामुळे पूर्णपणे शाकाहारी आहार घेणाऱ्यांना आवश्यक प्रमाणात बी-12 मिळण्यात अडचणी येऊ शकतात. संशोधनानुसार, शाकाहारी पुरुषांमध्ये मांसाहारी पुरुषांच्या तुलनेत बी-12च्या कमतरतेचा धोका 4.4 पट अधिक आहे. बी-12ची कमतरता झाल्यास रक्तातील होमोसिस्टीन या घटकाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने या कमतरतेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

आहारातील कमतरता प्रमुख कारण

या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे 95 टक्क्यांहून अधिक नागरिकांमध्ये व्हिटॅमिन बी-12 शोषणाची प्रक्रिया व्यवस्थित असल्याचे आढळले. यावरून बहुतांश नागरिकांमध्ये शरीराची बी-12 शोषून घेण्याची क्षमता योग्य असली, तरी आहारातून पुरेशा प्रमाणात हे जीवनसत्त्व मिळत नसल्याने कमतरता निर्माण होत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

या संशोधनाचे प्रमुख संशोधक डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासात 25 ते 30 तज्ज्ञ सहभागी असून, गेल्या अनेक वर्षांपासून विविध टप्प्यांत संशोधन सुरू आहे. आहारातील असंतुलन हे बी-12च्या कमतरतेमागील महत्त्वाचे कारण असून, विशेषतः शाकाहारी व्यक्तींनी आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

व्हिटॅमिन बी-12ची कमतरता टाळण्यासाठी आहारात दूध, दही, पनीर, चीज आणि अंडी यांसारख्या पदार्थांचा समावेश करणे उपयुक्त ठरू शकते. शाकाहारी व्यक्तींनी बी-12 युक्त फोर्टिफाइड अन्नपदार्थ आणि धान्यांचे सेवन करण्यावर भर द्यावा. मात्र, केवळ आहारातील बदल पुरेसे नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने बी-12 च्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स घेण्याची आवश्यकता असू शकते. सततचा थकवा, अशक्तपणा, हात-पायांना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे ही बी-12च्या कमतरतेची संभाव्य लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने आवश्यक रक्ततपासण्या करून घेणे महत्त्वाचे आहे.

Exit mobile version