Download App

अजितदादांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘शिवतारे बापूंची’ ताकद नेमकी किती?

Image Credit: Letsupp

“बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांचे टेन्शन वाढले आहे. शिवतारे यांच्या या शड्डू ला जुन्या वादाची किनार असली तरीही यंदा बारामतीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांना पराभूत करायचे असल्याने हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील अशा सगळ्या नेत्यांनी मध्यस्थी केली. पण शिवतारे माघार घ्यायला तयार नाहीत. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचे टेन्शन वाढविणाऱ्या शिवतारे बापूंची मतदारसंघातील नेमकी ताकद किती आहे, हे पाहणे महत्वाचे ठरते.

विजय शिवतारे यांची राजकीय कारकीर्द घडली ती राष्ट्रवादीमध्ये आणि मुंबईमध्ये. दहावी झाल्यानंतर काही तरी मोठी संधी मिळेल या आशेने त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. दुकानात, गाड्यावर काम करत, दुध, मासळीचा व्यवसाय करत त्यांनी सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तिथून ते बांधकाम व्यवसायाकडे वळले. तिथे स्थिरावल्यानंतर 2000 च्या आसपास त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. काही वर्ष पक्षात काम केल्यानंतर त्यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन वेळा तिकीट मिळाले.  पण दोन्ही वेळा त्यांना अपयश आले. (What is the strength of Vijay Shivtare who is increasing the tension of Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati Lok Sabha Constituency)

पण पराभावानंतर शिवतारे स्वस्थ बसले नाहीत. त्यांना कोणीतरी सल्ला दिला की गावाकडे जाऊन कामाला सुरुवात कर. त्यांनी हा सल्ला मनावर घेतला आणि ते पुरंदरला परत आले. पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा जनता दलाचा आणि दादा जाधवराव यांचा बालेकिल्ला होता. बारामतीच्या शेजारी हा मतदारसंघ असूनही दादा जाधवराव यांनी पाचवेळा इथून विजय मिळविला. शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 2004 साली म्हणजे केवळ एकदा हा मतदारसंघ जिंकता आला होता. 2009 च्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीच्या दिगंबर दुर्गाडे यांना 44 हजार मते होती. शिवसेनेचीही या पक्षात किरकोळ ताकद होती. 2004 साली शिवसेनेला या मतदारसंघात केवळ 32 हजार मते होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही कांता नलावडे यांना पुरंदर विधानसभा निवडणुकीत अवघी 37 हजार मते मिळाली होती.

‘त्या’ प्रस्तावात बदल शक्य, चर्चा करू; ‘वंचित’ने सोबत यावे एवढीच भूमिका : संजय राऊत

अशा या जनता दलाच्या बालेकिल्ल्यात काम सुरु करणे सोपे नव्हते. पण त्यांनी हे शिवधनुष्य उचलले. त्यांनी राष्ट्रवादाची काम सुरु केले. पण स्थानिक नेत्यांना वैतागून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र शिवसेनेचे रोपटे लावणे सोपे नव्हते. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवतारेंनी करुन दाखविले. त्यांनी या मतदारसंघावर पहिल्यांदाच भगवा फडकवला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या वर्षभरात त्यांनी शिवसेनेची ताकद वाढविली. ज्या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला युतीमध्ये कांता नलावडे यांना 32 हजार मते मिळाली होती तिथे शिवतारे यांना तब्बल 68 हजार मते मिळाली.

त्यानंतरच्या म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना पाच लाख 21 हजार आणि महायुतीच्या महादेव जानकर यांना चार लाख 51 हजार मते होती. यात पुरंदर विधानसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना 78 हजार 067 मते होती. तर सुप्रिया सुळे यांना 72 हजार 431 मते मिळाली होती.

त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीतील भाजप-शिवसेना आणि आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे आपल्याला शिवतारे यांच्या स्वतंत्र ताकदीचा अंदाज येऊ शकतो. त्यावेळी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना 82 हजार आणि भाजपच्या संगीतादेवी राजेनिंबाळकर यांना केवळ 18 हजार 918 इतकी मते होती. तर काँग्रेसच्या संजय जगताप यांना 73 हजार आणि राष्ट्रवादीच्या अशोक टेकवडे यांना 28 हजार मते होती. म्हणजेच इथेही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवतारे सरस ठरले होते.

भाजपात घमासान! माजी उपमुख्यमंत्र्यांची बंडखोरी; येदियुरप्पांच्या मुलाविरोधात ठोकला शड्डू

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना सहा लाख 86 हजार तर भाजपच्या कांचन कुल यांना पाच लाख 30 हजार मते मिळाली होती. यात पुरंदरमध्ये कांचन कुल यांना 95 हजार 191 मते होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या विजय शिवतारे यांना 99 हजार 306 मते होते. म्हणजेच कुल यांच्यापेक्षाही शिवतारे यांना जास्त मते होती. आता शिवसेना फुटली आहे. त्यामुळे शिवसेनेची साधारण 35 ते 40 हजार मते वजा केली तरीही स्वतः शिवतारे यांची किमान 60 ते 65 हजार मते या मतदारसंघात आहेत.

सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी याच मतांवर अजित पवार यांचा डोळा आहे. राष्ट्रवादीची 30 ते 40 हजार आणि शिवतारे-भाजपची 60 ते 65 हजार अशी किमान एक लाख मते सुनेत्रा पवार यांना मिळावी यासाठी अजितदादा प्रयत्नशील आहेत. मात्र शिवतारे यांनी पवार यांच्या विरोधातील 2019 मधील सव्वा पाच लाख मतदारांना आणि पुरंदरच्या जनतेला संधी देण्यासाठी आपण बारामतीमधून निवडणूक लढविणारच आहोत, अशी घोषणा केली आहे. पण त्यांच्या या दाव्यामुळे अजितदादांचे मात्र टेन्शन वाढले आहे. आता यात विजयबापू शिवतारे यांचा विजय होणार की अजितदादा पुन्हा बापूंवर भारी पडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज