पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून (Kasaba Assembly Constituency) निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांनी भेट घेत ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघातून गतवेळी निवडणूक लढविलेले हेमंत रासने, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह कुणाल टिळक यांचीही इच्छुकांमध्ये भर पडली आहे.
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर गत पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबात उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, ऐनवेळी हेमंत रासने यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे टिळक कुटुंबिय आणि पेठेतील ब्राह्मण समाज काहीसा नाराज झाला होता. काही अज्ञातांनी पेठेत ब्राह्मण समाजातील उमेदवार न दिल्याने बॅनर्स लावून नाराजी व्यक्त केली होती. त्याचा फटकाही भाजपला बसला. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार मतांनी विजय मिळविला. (Who will be BJP’s candidate against Ravindra Dhangekar of Congress in Kasba Peth Assembly Constituency)
पराभूत झाल्यानंतर हेमंत रासने यांनी खचून न जाता पुढच्या निवडणुकीची तयारी सुरु केली. गेल्या दोन वर्षांपासून ते मतदारसंघात तयारी करत आहेत. जनसंपर्क वाढवत आहेत. झालेल्या चुका सुधारत रासने यांनी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा कुणाल टिळक यांनी देखील लोकांमध्ये फिरणं सुरू केलं आहे. गेल्या वर्षभरापासून कुणाला टिळक कसब्यात फिरत आहेत. त्यामुळेच मी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना मिळालेले 11 हजारांचे लीड तोडून लोकसभा निवडणुकीत कसब्यातून 17 हजारांचे लीड महायुतीला मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही कसब्यात परिवर्तन पाहायला मिळेल, असा विश्वासही कुणाल टिळक यांनी व्यक्त केला आहे. तर आपण केलेल्या कामाचा चांगला परिणाम कसब्यातील मतदारांवर झाला आणि लोकसभेला कसब्यातून लीड मिळाल्याची प्रतिक्रिया रासने यांनी देत आपल्यालाच पुन्हा तिकीट मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुण्यामध्ये भाजपकडून ब्राह्मण समाजावर अन्याय होतो, असा सूर कायमच होता. ही नाराजी दूर करण्यासाठी कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आले. त्यानंतर ब्राह्मण समाजाची नाराजी बऱ्यापैकी दूर झाली आहे. आता पुन्हा कसब्यात ब्राह्मण उमेदवाराला भाजपकडून संधी मिळणार की रासनेंना रिटेन केले जाणार की अन्य पर्याय दिला जाणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.