Asian Games 2026 Cricket : एशियन गेम्स 2026 मधील क्रिकेट स्पर्धेचा अधिकृत ड्रॉ आणि गटवारी जाहीर करण्यात आली असून भारताच्या पुरुष आणि महिला संघांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्कृष्ट क्रमवारीमुळे भारतीय पुरुष आणि महिला संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही संघांना स्पर्धेची सुरुवात नॉकआऊट फेरीतून करता येणार असून सुवर्णपदकाच्या दिशेने त्यांचा प्रवास तुलनेने सोपा मानला जात आहे. यंदाचे एशियन गेम्स जपानमधील नागोया येथे होणार असून क्रिकेटचे सर्व सामने टी-20 स्वरूपात खेळवले जाणार आहेत. आशियातील अव्वल संघांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाकडून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महिला क्रिकेट स्पर्धेचे सामने 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. त्यानंतर पुरुष क्रिकेट स्पर्धेला 24 सप्टेंबरपासून सुरुवात होईल आणि 1 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना पार पडेल. दोन्ही स्पर्धांमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या चार अव्वल संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर अफगाणिस्तान, हाँगकाँग, जपान, मलेशिया, नेपाळ आणि ओमान या संघांना प्राथमिक फेरी खेळावी लागणार आहे.
या सहा संघांचे प्रत्येकी तीन संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर त्यांचा सामना भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या आधीच पात्र ठरलेल्या संघांविरुद्ध होईल. त्यामुळे प्राथमिक फेरीतून येणाऱ्या संघांसाठी मोठे आव्हान असणार आहे. महिला क्रिकेट स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून स्पर्धेची सुरुवातच क्वार्टर फायनलपासून होणार आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना यजमान जपानविरुद्ध होणार आहे.
भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय; २-० ने मालिका खिशात, ईशान किशन ‘सामनावीर’
भारताचा महिला संघ सध्या आशियातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जात असल्याने त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान, 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेटने इतिहास रचला होता. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले होते. पुरुष अंतिम सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगला होता. मात्र पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. अफगाणिस्तानने 18.2 षटकांत 5 बाद 112 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. स्पर्धेतील उच्च मानांकनामुळे भारताला विजेता घोषित करण्यात आले आणि सुवर्णपदक बहाल करण्यात आले.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. या विजयामुळे भारतीय महिला क्रिकेटनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता एशियन गेम्स 2026 मध्ये भारतासमोर दुहेरी सुवर्णपदकाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाल्याने पदकाच्या शर्यतीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. नागोयामध्ये होणाऱ्या या स्पर्धेकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा सुवर्ण यशाची अपेक्षा आहे.
