World Cup 2023 : भारतामध्ये वर्ल्डकपचा महासंग्राम आता शिगेला पोहचला आहे. वर्ल्डकपमध्ये मोठे उलटफेर होताना दिसत आहे. कालच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची अफगाणी संघाने चांगलाच पराभव केला. अशातच पाच वेळा विजेतेपद मिळवणारी ऑस्ट्रेलिया टीम (Australia team) मात्र यंदा गुणतालिकेच्या (Scoreboard) तळाशी गेली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून म्हणावा तशी कामगिरी होताना दिसत नाही. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना श्रीलंकेसोबत लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेऊयात…
Imtiaz Jalil : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, जलील कडाडले
ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. वर्ल्डकप विजेतेपदाची दावेदार असणारी ऑस्ट्रेलिया यंदा संघर्ष करतेय, त्याला कारणीभूत भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांना न गवसलेला सूरच म्हणता येईल. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाठलाग केला. दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकूनही 200 धावा करण्यात त्यांना अपयश आले. ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने हार पत्करल्या, त्या त्यांच्या संघ व्यवस्थापनासाठी चिंतेची बाबच म्हणावी लागेल. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नास लाबूशेन यांना वगळता त्यांच्या फलंदाजीच्या प्रदर्शनात आक्रमकतेचा अभाव दिसत आहे. कारण इतर कोणताही खेळाडू 30 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. त्यामुळेच दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना 200 चा आकडा पार करता आला नाही.
ऑस्ट्रेलियाला भारतातील विश्वचषक स्पर्धेतील परिस्थितीशी जुळवून घेत आहेत, असे कर्णधार पॅट कमिन्सने रविवारी लखनौ येथील पत्रकार परिषेदेत सांगितले. पाच वेळा चॅम्पियन या स्पर्धेतील पहिला विजय शोधत आहेत. कमिन्स म्हणाला भारतीय खेळपट्ट्या जशा दिसतात, तशा त्या खेळत नाहीत, त्या सपाट असतानाही स्पिंनर्सला मदत करतात. त्यामुळेच त्या समजायला आम्हाला आतापर्यंत कठीण गेलं आहे. पण आम्ही पुढच्या सामन्यामध्ये खेळपट्ट्याशी जुळवून घेऊन सकारात्मक निकाल आणू, अशी अपेक्षा आहे
ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने पाच एकदिवसीय विश्वचषक, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी, एक टी-२० विश्वचषक तसेच एक जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुद्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने पाच एकदिवसीय विश्वचषक (1987, 1999, 2003, 2007, 2015) जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीवरही कब्जा केला आहे. 2006 आणि 2009 मध्ये संघ चॅम्पियन झाला होता. यानंतर 2021 मध्ये T20 विश्वचषक जिंकला आणि 2023 मध्ये कसोटी चॅम्पियनशिप जिंकली.
पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्ससाठी गुणतालिकेत तळाला स्थान मिळणे नवीन नाही, पण ऑस्ट्रेलिया दहाव्या क्रमांकावर आहे, हे आश्चर्यकारक आहे.
दरम्यान आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया चमकदार कामगिरी करून जोरदार असं कमबॅक करणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.