Australia vs Bangladesh 1st Test: बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांग्या टाकल्या;198 धावांवर रोखले !

Australia vs Bangladesh: गोलंदाजीत बांगलादेशकडून हसन महमूदने जबरदस्त कामगिरी करत 55 धावांत 6 विकेट्स घेतल्या.

Hasan Mahmud

Hasan Mahmud

Australia vs Bangladesh 1st Test : बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्याच कसोटीच्या पहिल्याच डावात या संघाने ऑस्ट्रेलियाला रोखण्याची जबरदस्त कामगिरी केलीय. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज तग धरू शकले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ 198 धावावंर गारद झाला. त्यानंतर बांगलादेशने दिवसअखेर 1 बाद 96 धावा केल्यात. त्यामुळे पहिल्याच दिवशी बांगलादेशने सामन्यावर आपली पकड मजबूत केलीय.

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना डार्विन येथील मरारा मैदानावर खेळविला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस बांगलादेशने गाजविला. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात 102 धावांची आघाडी घेतली असली तरी बांगलादेशच्या हातात अजून 9 फलंदाज शिल्लक आहेत.

बांगलादेशचे फलंदाज भक्कमपणे खेळले
बांगलादेशच्या पहिल्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. शादमान इस्लाम 30 चेंडूंचा सामना करून 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर तंजीद हसन तमीम आणि मोमिनुल हक यांनी डाव सावरला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत या दोघांनी संघाला आणखी कोणताही धक्का बसू दिला नाही. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 60 धावांची नाबाद भागीदारी केलीय. तंजीदने 67 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या आहेत. तर मोमिनुल हकने 49 चेंडूंमध्ये 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून एकमेव विकेट मिचेल स्टार्कने घेतलीय.


वेगवान गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ‘फेल’

बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 198 धावांवर संपुष्टात आणला. ट्रेव्हिस हेड आणि जॅक वेदराल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. हेड 22 धावांवर हसन महमूदच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला, तर वेदराल्ड 23 धावांवर बाद झाला. मार्नस लाबुशेन केवळ 1 धाव करून तंबूत परतला. इबादत हुसैनचा बळी ठरला. कॅमेरून ग्रीन 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान अॅलेक्स कॅरीने 19 आणि ब्यू वेबस्टरने 12 धावा केल्या. मात्र, स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरत अर्धशतकी खेळी केलीय. स्मिथने 109 चेंडूंचा सामना करत 71 धावा केल्या. हसन महमूदच्या गोलंदाजीवर लिटन दासने त्याचा झेल घेतला. कर्णधार पॅट कमिन्स केवळ 9 धावा करू शकला. मिचेल स्टार्कने एक आणि नॅथन लायनने सात धावा केल्या. जोश हेझलवूड सात धावांवर नाबाद राहिला.


हसन महमूदसमोर कांगारुंनी नांग्या टाकल्या

गोलंदाजीत बांगलादेशकडून हसन महमूदने जबरदस्त कामगिरी करत 55 धावांत 6 विकेट्स घेतल्या. तर तस्किन अहमद आणि इबादत हुसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

Exit mobile version