Gautam Gambhir : भारतीय संघ 15 ऑगस्टपासून श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघाने आतापर्यंत दोन आयसीसी स्पर्धेत बाजी मारली आहे मात्र कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याने बीसीसीआय भविष्याबाबत विचार करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध होणारी मालिका भारतीय संघासह गौतम गंभीरसाठी देखील अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला या मालिकेतील दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.
‘क्रिकब्लॉगर’च्या (CricBlogger) अहवालानुसार, गौतम गंभीरवरील (Gautam Gambhir) दबाव वाढत चालला आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेताना त्यांनी स्वतःचा सपोर्ट स्टाफ सोबत आणला होता, तरीही त्या मूळ गटातील आता केवळ ते आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल हेच उरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ आणि ‘टी20 विश्वचषक 2026’ जिंकले असले, तरी ‘रेड-बॉल’ क्रिकेटमध्ये (कसोटी क्रिकेटमध्ये) संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडमधील मालिका बरोबरीत (2-2) सुटल्याचा अपवाद वगळता, भारताला परदेशातील परिस्थितीत चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि मायदेशातही दोन कसोटी मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
गंभीर जबाबदारी स्वीकारत नाहीत
अहवालात पुढे म्हटले आहे की, गौतम गंभीर पराभवाची जबाबदारी स्वीकारणे टाळतात आणि त्याऐवजी खेळाडूंवर दोष ढकलतात. बीसीसीआयचे (BCCI) अधिकारी या वृत्तीमुळे नाराज आहेत. श्रीलंका विरुद्धची आगामी कसोटी मालिका त्यांच्या कार्यकाळाची एक महत्त्वाची परीक्षा ठरू शकते कारण भारताच्या ‘डब्ल्यूटीसी’ (WTC) अंतिम फेरी गाठण्याच्या आशा मोठ्या प्रमाणात या दौऱ्यावर अवलंबून आहेत.
अनिल देशमुख पुन्हा चर्चेत; राज्यपालांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यासाठी मंजुरी
‘क्रिकब्लॉगर’ ने दिलेल्या माहितीनुसार, पराभवासाठी खेळाडू, सेंटर ऑफ एक्सलन्स किंवा सपोर्ट स्टाफच्या सगस्यांना गंभीरकडून दोष देण्यात येतो असा आरोप गंभीरवर करण्यात येत आहे. तर संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी मात्र क्वचितच स्वीकारतात. गंभीरची ही कार्यपद्धती ड्रेसिंग रूममध्ये फारशी पसंत केली जात नाही. वरिष्ठ खेळाडूंनी माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या ‘अपेक्स कौन्सिल’च्या सदस्यांशीही चर्चा केली आहे. या चर्चा अनौपचारिक असल्या तरी, त्यामुळे मुख्य प्रशिक्षकावरील तपासणी आणि टीकेची तीव्रता वाढली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरला त्याच्या पसंतीचे सहाय्यक कर्मचारी निवडण्यापासून ते निर्णय घेण्याच्या अधिकारांपर्यंत सर्व काही देण्यात आले आहे तरीही संघाच्या कामगिरीने आतापर्यंत त्या विश्वासाला साजेसे प्रदर्शन केलेले नाही असं देखील या अहवालात सांगण्यात आले आहे.
