Match Fixing: क्रिकेट लीग 2023 मध्ये फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी हे प्रकरण बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammad Siraj) संबंधित आहे. रिपोर्टनुसार, ‘एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला बंगळुरू संघाची अंतर्गत माहिती देण्यास सांगितले. सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला दिली आहे. बीसीसीआयने (BCCI) भ्रष्टाचाराबाबत कडक आचारसंहिता बनवली आहे. कोणताही खेळाडू किंवा अधिकाऱ्याशी बुकीने संपर्क केल्याची माहिती बीसीसीआयला दिली नाही, तर बोर्ड त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या सामन्यात सट्टेबाजीदरम्यान बरेच पैसे गमावल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीला (जो ड्रायव्हर आहे) सिराजकडून संघातील माहिती हवी होती. त्या व्यक्तीने सिराजला फोन केला. मात्र यानंतर सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही माहिती दिली. पण तो बुकी नसल्याची माहिती आहे. तो व्यक्ती हैदराबादचा ड्रायव्हर आहे. त्याला सट्टा लावण्याची सवय आहे. सट्टेबाजीत त्याने बरेच पैसे गमावले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या घटनेची माहिती दिली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.
क्रिकेट लीगमध्ये फिक्सिंग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग झाली आहे. त्यावेळी एस श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय चेन्नईच्या गुरनाथ मयप्पनवरही स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अशा गोष्टींना सामोरे जाण्यासाठी कठोर नियम केले आहेत.