मेलबर्नः ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कॅमरून ग्रीनवर आयपीएलमध्ये तब्बल 17 कोटी 50 लाखांची बोली लागली होती. त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे. त्याच्यावर मोठी बोली का लागली ते आज दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यातून समोर आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आफ्रिकेचा संघ अवघ्या 189 धावांत गारद झाला. आफ्रिकेचे फंलदाज ग्रीनसमोर खेळपट्टीवर तग धरू शकले नाही. ग्रीनने अवघ्या 27 धावांत पाच बळी घेतले.
आफ्रिकेचे शेवटचे पाच फलंदाज अवघ्या दहा धावांत तंबूत परतले. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 1 बाद 45 धावा केल्यात. डेव्हिड वॉर्नर 32 आणि मार्नस लाबुशेन 5 धावांवर खेळत आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाला कागिसो रबाडाने एक धावेवर तंबूत परतविल्याने आफ्रिकेला एक बळी मिळवता आला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अवघ्या 67 धावांवर अर्धासंघ माघारी परतला होता. त्यानंतर काइल वेरीने आणि मार्को जानसेन यांनी सहाव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. वेरीने 52 आणि जानसेनने 59 धावा केल्या. सलामीला आलेल्या सरेल एरवी आणि थ्यूनिस ब्रुईन हे बाद झाल्याने आफ्रिकेची 2 बाद 56 धावा अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कर्णधार डीन एल्गरही 26 धावांवर बाद झाला. पुढील चेंडूवर मिशेल स्टार्कने तेंबा बावुमाला झेलबाद करत तंबूत परतला.
दुसऱ्या सत्रात जोंडोही 5 धावांवर बाद झाला. आफ्रिकेचे चार फलंदाज हे 11 धावांवर तंबूत परतले होते. 22 धावांवर जीवनदान मिळालेल्या जानसेनने कसोटीतील पहिले अर्धशतक झळकविले. ग्रीनने वेरीनला पहिल्या स्लीपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर ग्रीनने पुढच्याच षटकात जानसेन आणि रबाडाला तंबूत परतविले. त्यानंतर आफ्रिकेचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरू न शकल्याने आफ्रिकेचा डाव 189 धावांत गारद झाला.