धर्मशाला : वनडे विश्वचषक 2023 मध्ये सर्वात थरारक सामना आज (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान रंगणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होणार आहे. (Chance of rain in India vs New Zealand match)
पण या दरम्यान, दोन्ही देशांच्या खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक चिंतेत टाकणारी बातमीही येत आहे. या सामन्यावर सध्या पावसाचे सावट आहे. पावसामुळे हा सामना पूर्ण होण्याची आशा फारच कमी आहे किंवा कमी षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी धर्मशालामध्येच झालेला नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पावसामुळे 43 षटकांचा खेळवण्यात आला होता.
Accuweather नुसार, रविवारी धर्मशालामध्ये कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी पावसाची शक्यता 42 टक्के आहे. आकाश ढगाळ असेल आणि वाऱ्याचा वेग 26 किमी/ताशी असेल.
हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून यादरम्यान पावसाची शक्यता सर्वाधिक आहे. धर्मशालामध्ये दुपारी 2 वाजता पावसाची शक्यता 51 टक्के आणि दुपारी 3 वाजता 47 टक्के आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे 3 वाजल्यानंतर पावसाची शक्यता खूपच कमी आहे. 4 ते 6 या वेळेत पावसाची शक्यता 14 टक्के असणार आहे. यानंतर ही शक्यता 2 टक्क्यांपर्यंत राहील. यामुळेच सामना उशिरा सुरू होऊ होऊन कमी षटकांचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कमाल तापमान: 18 अंश सेल्सिअस
किमान तापमान: 11 अंश सेल्सिअस
पावसाची शक्यता: 42%
ढगाळ: 99%
वाऱ्याचा वेग असेल: 26 किमी/तास
विश्वचषक 2023 साठी आयसीसीच्या नियमांनुसार, लीग सामन्यांसाठी ‘राखीव दिवस’ ची तरतूद नाही. आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात येईल. पण आतापर्यंतच्या विश्वचषकातील एकाही सामन्यात पावसाने व्यत्यय आणलेला नाही.