India vs Pakistan : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत काल भारताने परंपरा राखत पाकिस्तानची धुळधाण उडवली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत पाकिस्तानला पाणी पाजलं. या सामन्याचा देशभरातून प्रचंड विरोध होत होता. कारण याला पहलगाम हल्ल्याच्या दुःखाची किनार होती. विरोध होत असताना देशभरात आंदोलने होत असतानाही हा सामना झाला आणि भारताच्या जिगरबाज खेळाडूंनी पाकिस्तानला पुन्हा धडा शिकवला. मैदानावरचा सामना जसा जिंकला तसाच मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. या प्रकाराने पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट टीमने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे मॅनेजरने पीसीबीच्या इशाऱ्यावर (India vs Pakistan) काम करत भारतीय संघाची तक्रार केली आहे. पीटीआयनुसार मॅनेजर नवीद अख्तर चीमाने टीम इंडियाच्या या वर्तणुकीसंदर्भात आयसीसीकडे पाकिस्तानची बाजू मांडली आहे. याआधी सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांना समर्पित केला. सामना जिंकल्यानंतर एकाही भारतीय खेळाडून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. इतकेच नाही तर ड्रेसिंग रुमचा दरवाजाही बंद करून टाकला.
पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं, दरवाजाही बंद केला; टीम इंडियाने मैदानाबाहेरचाही सामना जिंकला
भारतीय खेळाडूंना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करायचे नाही. खेळाडूंनी या सूचनांचे तंतोतंत पालन केले. सामना सुरू होण्याआधी अर्धा तास बैठक झाली होती. या बैठकीत खेळाडूंना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार खेळाडूंनी मैदानात पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलेच नाही.
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर्सचा जळफळाट
या प्रकारामुळे पाकिस्तानात हाहाकार (Pakistan Cricket) उडाला आहे. माजी खेळाडू या प्रकारावर चांगलेच चिडले आहेत. बासित अली म्हणाला की हा आशिया कप आहे. आता आयसीसीच्या टूर्नामेंटमध्येही असेच घडताना दिसेल. कामरान अकमलने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. क्रिकेटच्या चांगल्यासाठी हा प्रकार योग्य नाही असे अकमल म्हणाला.