Download App

इंग्लंडने 22 वर्षांची प्रतीक्षा संपवली, घरात घुसून पाकिस्तानला नमवले

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रावळपिंडीत खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. या सामन्यात स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या अधिक सपाट खेळपट्टीवर, सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी इंग्लंडने पराभवाची जोखीम पत्करण्यास मागेपुढे पाहिले नाही.

पाकिस्तानसमोर 343 धावांचे लक्ष्य होते आणि चौथ्या दिवसअखेर त्यांनी 2 गडी गमावून 80 धावा केल्या होत्या. कर्णधार बाबर आझम बाद होताच सामना पलटला. शेवटच्या दिवसाचा खेळ रंजक होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात पाकिस्तानने चांगली सुरुवात केली आणि केवळ 1 गडी गमावून 89 धावा केल्या. पाकिस्तानी संघ या सामन्यात पुनरागमन करून इंग्लंडलाही हरवू शकेल, असे वाटत होते. दुसऱ्या सत्रातही त्यांनी दमदार फलंदाजी केली. अझर अली, सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार फलंदाजी केली. यादरम्यान पाकिस्तानने केवळ 2 विकेट गमावल्या आणि ब्रेकपर्यंत 5 विकेट्सवर 257 धावा केल्या होत्या.

शेवटच्या सत्रात पाकिस्तानला 86 धावांची गरज होती आणि त्यांच्या 5 विकेट शिल्लक होत्या. इथेच ऑली रॉबिन्सनने सामना बदलला. या उंच वेगवान गोलंदाजाने सलग दोन षटकांत आगा सलमान आणि अझहर अलीच्या विकेट घेत संघाच्या विजयाचा मार्ग खुला केला. यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आणखी दोन विकेट घेत विजय निश्चित केला.

मात्र, शेवटच्या विकेटसाठी नसीम शाह आणि मोहम्मद अलीने इंग्लंडला 9 षटके झुंजवली. हळूहळू अंधार पडत होता. सामना अनिर्णित राहण्याची शक्यता होती, पण डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचने पहिल्याच षटकात नसीम शाहला एलबीडब्ल्यू आऊट करत सामना जिंकवला.

Tags

follow us