IND vs SL Asia Cup : आशिया चषकात सुपर 4 मध्ये पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलेल्या भारतीय संघ मात्र लंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर चाचपडत खेळताना दिसला आहे. लंकेविरुद्ध भारतीय फलंदाज अवघ्या 213 धावा करू शकला आहे. लंकेकडून सर्व दहा गडी फिरकी गोलंदाजांनी बाद केलेत.दुनिथ वेल्लालागेने सर्वाधिक पाच, तर चरिथ असालंकाने चार गडी बाद केले आहेत. प्रत्युत्तर लंकेची सुरुवात खराब झाली आहे. सात धावांवर लंकेचा एक गडी बाद झाला आहे.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकविले आहे. रोहितने 53 धावांची खेळी केली आहे. भारताकडून या सामन्यात त्यानेच सर्वाधिक धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त केएल राहुलने 39 धावा केल्या आहेत. या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या इशान किशनने चौथ्या क्रमांकावर येत चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. किशनने 33 धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने 26 धावा केल्या आहेत.
भारत विरुध्द श्रीलंका सामना कोलंबोतील के. आर. प्रेमदासा मैदानात खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने चांगली सुरुवात केली. पहिल्या दहा षटकांत भारताने बिनबाद 65 धावा केल्या. परंतु वीस वर्षीय फिरकी गोलंदाज दुनिथा वेल्लालागेने घातक गोलंदाजी करत लागूपाठ तीन फलंदाज बाद केले. वेल्लोलागेने गिलला तंबूत परतविले. भारताला 80 धावांवर पहिला झटका बसला. वेल्लालागेने विरोट कोहलीला अवघ्या तीन धावांवर बाद केले. तर संघाची धावसंख्या 91 असताना रोहित शर्माचा वेल्लालागेने त्रिफळा उडविला. एकवेळ मजूबत स्थितीत असलेला भारतीय संघाची मोठी पडझड झाली.
तीन गडी बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि के. एल. राहुलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. ही जोडीही वेल्लालागेने तोडली. त्याने के. एल. राहुलला बाद केले. त्यानंतर भारतीय डाव गडगडला. इशान किशनही 33 धावांवर बाद झाला. वेल्लालागेने हार्दिक पंड्याला पाच धावांवर बाद करत पाचवा गडी बाद केले. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादवही लगेच बाद झाले. पण अक्षर पटेलने महत्त्वाची 26 धावांची खेळी केल्याने भारतीय संघ 49. 1 षटकांत 213 धावांवर गारद झाला.