विधानसभा निवडणूक तारखांची प्रतीक्षा; IPL 2026 वेळापत्रकावर अनिश्चिततेचे सावट

आयपीएलच्या आगामी 2026 हंगामाच्या प्रारंभाबाबत मोठी हालचाल सुरू असून स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

Untitled Design 119

Untitled Design 119

IPL 2026 schedule under uncertainty : क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. आयपीएलच्या आगामी 2026 हंगामाच्या प्रारंभाबाबत मोठी हालचाल सुरू असून स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आयपीएलचा श्रीगणेशा 26 मार्च 2026 रोजी होणार असल्याची माहिती फ्रॅंचाईजींना देण्यात आली होती. मात्र, आता अंतर्गत चर्चेनंतर स्पर्धा 28 मार्च 2026 पासून सुरू करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचा समजतंय. अंतिम सामना 31 मे 2026 रोजी खेळवण्याचा आराखडा कायम ठेवण्यात येणार आहे.

15 डिसेंबर 2025 रोजी आयपीएल प्रशासनाने सर्व फ्रॅंचाईजींना प्राथमिक वेळापत्रकाची माहिती देताना २६ मार्च ही सुरूवातीची तारीख कळवली होती. त्यानुसार संघांनी आपापली लॉजिस्टिक्स, खेळाडूंचे आगमन, सर्व शिबिरे आणि प्रायोजक कार्यक्रमांचे नियोजन सुरू केले होते. मात्र, अलीकडील घडामोडींमुळे या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्याची गरज भासली आहे.

या विलंबामागे राजकीय कारणं असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून त्यांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. या तिन्ही राज्यांमध्ये आयपीएलचे महत्वाचे सामने आयोजित होणार आहेत. निवडणुकीच्या काळात सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याने, आयपीएल प्रशासन आणि राज्य सरकारे निवडणूक आयोगाच्या अंतिम तारखांची प्रतीक्षा करत असल्याचे सूत्रांकडून समजते.

मी बोलतो, तीच भाजपची अधिकृत भूमिका इतरांचं… वादग्रस्त व्यक्तव्यांवरून फडणवीसांकडून राणेंची कान उघडणी

विशेषतः मोठ्या शहरांमध्ये होणारे सामने, उद्घाटन सोहळा आणि प्ले-ऑफ टप्प्यातील लढतींसाठी व्यापक पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असते. निवडणूक प्रक्रियेच्या काळात सुरक्षा दलांची उपलब्धता मर्यादित असू शकते. त्यामुळे संभाव्य तारखांचा संघर्ष टाळण्यासाठी स्पर्धेची सुरुवात दोन दिवस पुढे ढकलण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

दरम्यान, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीच्या संभाव्य तारखांचा आढावा घेतला जाईल आणि सुधारित वेळापत्रकावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर अधिकृतरित्या सामन्यांच्या तारखा, स्थळे आणि उद्घाटन सामन्याची माहिती जाहीर केली जाईल. फ्रँचायझींच्या दृष्टीने हा बदल मोठा नसला तरी नियोजनात काही प्रमाणात फेरबदल करावे लागणार आहेत. परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मालिकांचे वेळापत्रक आणि प्रसारकांचे करार यांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रसारण हक्कधारक कंपन्याही संभाव्य बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे स्पर्धेची कालावधी किंवा अंतिम सामना यामध्ये कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. 31 मे 2026 रोजी अंतिम सामना खेळवण्याचा मानस कायम असून, प्ले-ऑफ सामने नियोजित कालावधीतच पार पडतील. आता सर्वांचे लक्ष पुढील आठवड्यातील गव्हर्निंग कौन्सिल बैठकीकडे लागले आहे. त्या बैठकीनंतरच आयपीएल 2026 हंगामाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असून, क्रिकेटप्रेमींना अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Exit mobile version