Ireland finally defeated India : टी-20 विश्वविजेता भारताला आयर्लंडने असा धक्का दिला आहे, ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती. बेलफास्टमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव करत इतिहास रचला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धचा हा आयर्लंडचा पहिलाच विजय ठरला. या पराभवासोबतच भारताचे आयर्लंडवरील तब्बल 17 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले, तर नवा टी-20 कर्णधार म्हणून पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यर याची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली.
2009 पासून भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 सामने खेळले जात होते. या काळात दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला होता. मात्र 26 जून 2026 रोजी बेलफास्टमध्ये इतिहास बदलला. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 182 धावांचा आव्हानात्मक डोंगर उभा केला आणि त्यानंतर भारतीय फलंदाजीची अक्षरशः मोडतोड केली.
भारताने नवा टी-20 विश्वविजेता म्हणून मैदानात पाऊल ठेवले होते. त्यामुळे विजयाची अपेक्षा स्वाभाविक होती. पण लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. संजू सॅमसन अवघ्या 5 धावांवर, तर इशान किशन केवळ 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर सर्वांच्या नजरा नव्या कर्णधार श्रेयस अय्यरवर होत्या. मात्र अय्यरलाही केवळ 3 धावा करता आल्या आणि भारताची अवस्था 50 धावांच्या आतच बिकट झाली.
राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग
एकीकडे विकेट्स पडत असताना सलामीवीर अभिषेक शर्मा याने झुंजार खेळी केली. अवघ्या 20 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावत भारतीय आशा जिवंत ठेवल्या. मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. मधल्या फळीत टिळक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघ 18.5 षटकांत 148 धावांवर सर्वबाद झाला आणि 34 धावांनी पराभूत झाला.
या विजयाचे शिल्पकार ठरले आयर्लंडचे गोलंदाज. मॅथ्यू हॅम्परेज आणि मॅट होलार्ड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत भारतीय फलंदाजीचा कणा मोडला. तर आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाच्या जय मॉड्रा याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. आयर्लंडची अवस्था एका टप्प्यावर 30 धावांत 3 बाद अशी झाली होती. मात्र कर्णधार लोरकॅन टकर याच्या अर्धशतकाने आणि गॅरेथ डेलनी याच्या आक्रमक 49 धावांनी आयर्लंडला 182 धावांपर्यंत पोहोचवले.
भारतासाठी हा पराभव केवळ एका सामन्याचा धक्का नाही, तर नव्या टी-20 पर्वाची कठोर सुरुवात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आता मालिकेत पुनरागमन करण्यासाठी दुसरा आणि अंतिम सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. तर दुसरीकडे, इतिहास रचणारा आयर्लंडचा संघ हा विजय कायम लक्षात ठेवेल. बेलफास्टमध्ये मिळालेला हा विजय आयर्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक म्हणून नोंदवला जाईल.
