Download App

महान फुटबॉलर पेले यांची प्रकृती गंभीर, मुलाची भावनिक पोस्ट

ब्राझील : फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांना ओळखलं जातं. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला आणि फुटबॉलमध्ये पेले यांना देव म्हटले जाते.

सध्या हाच फुटबॉलचा जादूगार पेले कर्करोगाशी लढा देत आहे. त्यांची प्रकृती नाजूक झाल्याचं समोर येत आहे. त्यांच्यावर साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते अजूनही रुग्णालयात आहेत. आता त्यांच्या मुलाने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत ‘बाबा…. माझी ताकद तुमची आहे’ असं कॅप्शन दिलं आहे.

फुटबॉल जगतात अनेक फुटबॉलर्सचं विश्वचषक जिंकणं स्वप्न असतं, अशामध्ये तब्बल तीन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू असलेले पेले सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांचा कर्करोग आता पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे, त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पेले यांना मागील वर्षी कोलन ट्यूमर काढण्यात आला होता.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेले केमोथेरपीला प्रतिसाद देत नाहीत. पेले यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त नाकारलं असलं तरी नुकताच पेले यांचा मुलगा एडिन्होने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्याने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत या पोस्टला, ‘बाबा…. माझी ताकद तुमची आहे’ असं कॅप्शन दिलं आहे. यावरुन पेले यांची प्रकृती नाजूक असल्याचं दिसून येत आहे. ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पेले यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. पेले यांच्या कोलनमध्ये ट्यूमर होता. तेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये ये-जा करू लागले. मात्र, आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून ते कॅन्सरशी लढताना दिसत आहेत.

Tags

follow us