9 चौकार, 8 षटकार आणि 49 चेंडूंमध्ये विक्रमी शतक; मिशेल मार्शनं एकानावर पाडला धावांचा पाऊस

मिचेल मार्शने अवघ्या 49 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत लखनौ संघासाठी स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला.

Untitled Design 93

Untitled Design 93

Mitchell Marsh hits record century in 49 balls : लखनौ सुपर जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात BRSABV एकाना क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला. पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला असला तरी मिचेल मार्श याच्या स्फोटक शतकाच्या जोरावर लखनौनं 19 षटकांत 3 बाद 209 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर पावसामुळे सुधारित नियमानुसार बंगळुरुसमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

लखनौच्या डावात मिशेल मार्श एकटाच बंगळुरुच्या गोलंदाजांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानं अवघ्या 49 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत लखनौ संघासाठी स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याच्या या तडाखेबाज खेळीत 9 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, याआधीही लखनौसाठी सर्वात वेगवान शतकाचा विक्रम त्याच्याच नावावर होता. त्यानं गुजरातविरुद्ध 56 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. आता त्यानं स्वतःचाच विक्रम मोडत नवा इतिहास घडवला आहे.

या शतकासह मिशेल मार्शनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले. लखनौकडून दोन शतकं करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी रिषभ पंत, के. एल राहुल, क्वॉटन डी कॉक आणि मार्कस स्टोनीस यांनी शतकी खेळी केली होती. मात्र, 50 पेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा मिशेल मार्श हा लखनौचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. लखनौसाठी सर्वात वेगवान शतकं कोणी केली आहेत. 49 चेंडूंत मिशेल मार्श विरुद्ध बंगळुरु, 54 चेंडूंत रिषभ पंत विरुद्ध बंगळुरु, 56 चेंडूंत केएल राहुल विरुद्ध मुंबई, 56 चेंडूंत मार्कस स्टॉइनिस विरुद्ध चेन्नई, 56 चेंडूंत मिशेल मार्श विरुद्ध गुजरात आणि 59 चेंडूंत क्विंटन डिकॉक विरुद्ध कोलकाता.

यंदाच्या हंगामात मिशेल मार्श लखनौच्या फलंदाजीचा कणा बनला आहे. त्यानं आतापर्यंत 363 धावा केल्या असून संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला 300 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे लखनौची फलंदाजी किती प्रमाणात मार्शवर अवलंबून आहे, हे पुन्हा स्पष्ट झालं आहे. याचबरोबर सलामीवीर म्हणून त्यानं स्पर्धेत 1000 धावांचाही टप्पा पार केला आहे. तसेच, लखनौसाठी १००० धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावरही तो पोहोचला आहे.

लखनौसाठी आजचा सामना ‘करा किंवा मरा’ असा मानला जात आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या लखनौनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे आज संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मोठी धावसंख्या उभारली. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोरही मोठं आव्हान असून विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.

Exit mobile version