BAN vs PAK : टी20 विश्वचषकच्या सुपर 8 मधून बाहेर पडल्यानंतर आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 11 मार्चपासून सुरु होणारा बांगलादेश दौरा रद्द होऊ शकतो. या दौऱ्यावर पाकिस्तान बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र सध्या इस्त्रायल, अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे पाकिस्तानचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांची (BAN vs PAK) मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानी संघ 9 मार्च रोजी बांगलादेशात दाखल होणार आहे मात्र आता हा दौरा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर ड्रोन हल्ले करण्यात आल्यानंतर आता इराण देखील अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी इतर अरब देशांवर जोरदार ड्रोन हल्ले करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विमान सेवा बंद करण्यात आली आहे.
पाकिस्तानी मीडिया आउटलेट जिओ सुपरच्या वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीमुळे प्रवासाचे धोके आणि सुरक्षा चिंता कमी झाल्यानंतरच बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तीन सामन्यांची मालिका आयोजित केली जाईल. 11, 13 आणि 15 मार्च रोजी मीरपूरमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवण्याचे नियोजन आहे. पाकिस्तान संघ 9 मार्च रोजी बांगलादेशात येणार होता, 11, 13 आणि 15 मार्च रोजी ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार होते. सध्याच्या प्रादेशिक तणावामुळे, हा दौरा अनिश्चित असल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार; जाणून घ्या सर्वकाही
तर दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सांगितले आहे की, त्यांना मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बीसीबी क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष नझमुल अबेदीन यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, “जर अशी परिस्थिती निर्माण झाली की ते प्रवास करू शकत नाहीत, तर आम्ही काहीही करू शकत नाही, परंतु आम्हाला अद्याप पीसीबीकडून याबद्दल कोणतेही पत्र मिळालेले नाही.”
