Saransh Jain: श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दोन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ (India) बीसीसीआयने जाहीर केलाय. तब्बल आठ महिन्यानंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र (Ravindra Jadeja) जडेजाचे संघात पुनरामन झाले आहे. संघात एका नवा खेळाडूचा समावेश झालाय. या खेळाडूचे नाव आहे सारांश जैन (Saransh Jain) आणि वय आहे 33 वर्षे. त्याला पहिल्यांदाच टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. या वयात अनेक खेळाडू ही निवृत्ती जाहीर करतात. पण सारांश जैन याने जिद्दीने खेळत राहत आंतराष्ट्रीय संघात स्थान मिळवत एक स्वप्न पूर्ण केलंय.
सारांश जैन हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो मध्य प्रदेशचा आहे. त्याने दशकाहून अधिक काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याच्या मेहनतीचे फळ मिळालंय. उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करणारा आणि डावखुरा फलंदाज असलेला सारांश जैन संघाचा भाग बनला आहे. तो रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांच्यासोबत भारतीय संघातील फिरकीचा भाग असणार आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे तो संघात नाही. त्यामुळे जैनला संघात संधी मिळालीय. त्याची प्रभावी ऑफस्पिन आणि तळाच्या फळीत धावा करण्याची क्षमता भारतीय संघासाठी मोठी जमेची बाजू ठरू शकते.
डोनाल्ड ट्रम्प नाहीतर चीनमुळे कोरियाच्या शेअर बाजारात भूकंप ! कोस्पीत तब्बल 11 टक्के घसरण
भारत ‘अ’ संघातून चमकदार कामगिरी
श्रीलंका ‘अ’ विरुद्ध गाले येथे झालेल्या सामन्यात सारांश जैनने दोन्ही डावांत अनुक्रमे 4/92 आणि 2/66 अशी गोलंदाजी केली. त्याचबरोबर नाबाद 70 धावांची खेळी करत भारत ‘अ’ संघाला दहा विकेट्सनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या मालिकेत भारताने 1-0 अशी बाजी मारली होती. आता त्याच गालेच्या मैदानावर जैन भारतीय वरिष्ठ कसोटी संघाच्या जर्सीत उतरणार आहे.
कोण आहे सारांश जैन?
सारांश जैनचा जन्म 31 मार्च 1993 रोजी इंदूर (मध्य प्रदेश) येथे झाला. त्याने 2014-15 हंगामात मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. क्रिकेटचा वारसा त्याला घरातूनच मिळाला. त्याचे वडील सुभोध जैन हे मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफी खेळले होते. भारतासाठी खेळण्याचे त्यांचे अपूर्ण स्वप्न पुढे सारांशने पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यात तो यशस्वी झाला आहे.
वेस्टर्न कल्चर ड्रग्ज, दारू आणि अनेकांसोबत… जेन-झी स्त्रियांबाबत कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य
वडिलांचा भावनिक संदेश ठरला प्रेरणा
सारांशच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याच्या आयुष्यात मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याच्या वडिलांना कर्करोगाचे निदान झाले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही माहिती त्याच्यापासून काही काळ लपवण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बोलता येत नसल्यामुळे सुभोध जैन यांनी एका कागदावर संदेश लिहून मुलाला क्रिकेटवर लक्ष केंद्रित ठेवण्याचा सल्ला दिला. तो हस्तलिखित संदेश सारांश आजही जपून ठेवतो.
रजत पाटीदारसोबत क्रिकेटचे धडे
इंदूरमधील प्रसिद्ध विजय क्लबमध्ये सारांश जैनने प्रशिक्षण घेतले. त्याच अकादमीत त्याच्यासोबत आजचा भारतीय क्रिकेटपटू रजत पाटीदार देखील सराव करत होता. विशेष म्हणजे सुरुवातीला सारांशचा मोठा भाऊच घरातील सर्वात मोठी क्रिकेटची आशा मानला जात होता. मात्र त्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्यानंतर कुटुंबाची अपेक्षा सारांशवर केंद्रित झाली आणि वडिलांनीच त्याचे पहिले प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
रणजी ट्रॉफीतून मिळाली मोठी ओळख
2021-22 च्या रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशने इतिहास रचत पहिले विजेतेपद पटकावले. या यशात सारांश जैनचा सिंहाचा वाटा होता.
उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यात त्याने 13 विकेट्स घेतल्या. अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाच्या विजयात योगदान दिले. त्यानंतर 2022-23 रणजी हंगामात त्याने 360 धावा आणि 35 विकेट्स घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूसाठी लाला अमरनाथ पुरस्कार मिळाला.
दुलीप ट्रॉफीतील दमदार कामगिरीने उघडले टीम इंडियाचे दार
2024 मध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत ‘अ’ संघाकडून खेळताना त्याने दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली. 2025 च्या दुलीप ट्रॉफीत त्याने सलग दोन सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या आणि उपांत्य व अंतिम सामन्यात महत्त्वाची अर्धशतके झळकावत ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला. यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये त्याने 518 धावा (सरासरी 57.55) आणि 30 विकेट्स (सरासरी 20.43) अशी शानदार कामगिरी केली. त्यामुळे तो केवळ गोलंदाज नव्हे, तर विश्वासार्ह अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला.
मेहनतीचे अखेर फळ
दहा वर्षांहून अधिक काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सारांश जैनला अखेर 33 व्या वर्षी भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे. संघर्ष, संयम आणि सातत्य यांच्या जोरावर त्याने भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले असून आता श्रीलंकेच्या भूमीवर तो भारतीय वरिष्ठ संघासाठी आपली छाप पाडण्यास सज्ज आहे.
