Heinrich Klaasen: ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाज हेनरिच क्लासेनने तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांचे पिसे काढत क्लासेनने 57 चेंडूत आपले शतक झळकविले. क्लासेनच्या 83 चेंडूत 174 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तब्बल 416 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याचबरोबर आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर पुन्हा एकदा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही नोंदविला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुध्द सर्वाधिक वेगाने शतक झळकविणारा क्लासेन हा दुसऱ्या फलंदाज ठरला. यापूर्वी विराट कोहलीने 2013 मध्ये जयपूरमध्ये 52 चेंडूत शतक झळकविले होते. पाचव्या क्रमांकाला फलंदाजीला आलेल्या क्लासेनने 174 धावांची खेळी करत एक विक्रमही नोंदविला आहे. पाचव्या क्रमांकाला खेळताना कपिल देवने 1983 च्या विश्वकपमध्ये झिम्बाब्वेविरुध्द नाबाद 175 धावांची खेळी केली आहे. आता अशी कामगिरी करणारा क्लासेन हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
क्लासेनने 83 चेंडूत 174 धावा केल्या आहेत. त्यात तब्बल तेरा चौकार आणि तेरा षटकार खेचले आहेत. याचबरोबर क्लासेन हा दक्षिण आफ्रिकेकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसऱ्या फलंदाजही ठरला आहे. आफ्रिकेकडून एबी डिविलियर्सने वेस्ट इंडिजविरुध्द 2015 मध्ये 16 षटकारांचा पाऊस पाडला. या सामन्यात क्लासेनने डेव्हिड मिलरबरोबर मिळून शेवटच्या नऊ षटकांत 164 धावांची भागिदारी केली होती. त्यात 14 षटकार आणि 11 चौकार मारले आहेत.
सातव्यांदा चारशेहून अधिक धावसंख्या
हेनरिच क्लासेनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुध्द 416 धावसंख्या उभी केली. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 24 वेळा असे झाले आहे. तर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्यांदा असा विक्रम नोंदविला आहे.
अॅडम झम्पाची धुलाई
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी हा दिवस खूपच वाईट राहिला. अॅडम झम्पाची जोरदार धुलाई झाली. त्याने दहा षटकांत तब्बल 113 धावा दिल्या. त्याला एकही गडी बाज करता आला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा मार्क लुईसचा नावावर असा विक्रम होता. आता त्यात झम्पाची भर पडली आहे.