आयपीएल 2026 – 28 मार्चपासून यंदाच्या हंगामाला सुरुवात; वेळापत्रकाची अजून प्रतीक्षा

चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून टी-20 विश्वचषकानंतर होणाऱ्या या स्पर्धेच्या तारखा अधिकृत प्रसारकाने जाहीर केल्या आहेत.

Untitled Design 156

Untitled Design 156

This year’s IPL starts from March 28th : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2026 संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. टी-20 विश्वचषकानंतर होणाऱ्या या स्पर्धेच्या तारखा अधिकृत प्रसारकाने जाहीर केल्या आहेत. अंतिम सामन्यादरम्यान प्रसारक स्टार स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार इंडियन प्रीमियर लीग 2026 चा हंगाम 28 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, स्पर्धेचे संपूर्ण अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर का?

आयपीएलच्या अधिकृत वेळापत्रकाला उशीर होण्यामागे देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ज्या तीन राज्यांमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत, त्या राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. या राज्यांमध्ये आसाम, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू यांचा समावेश आहे. कोलकाता हे कोलकाता नाईट रायडर्सचे होम ग्राऊंड आहे, तर चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्स आपले सामने खेळते. तसेच गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम मैदान आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतरच स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

ज्योती वाघमारे राज्यसभेत; शिवसेनेत आश्चर्य आणि नाराजी, एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित

विजेतेपद टिकवण्यासाठी उतरणार आरसीबी

गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने पंजाब किंग्स वर मात करत प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदा आरसीबीचा संघ आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आरसीबीच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ग्रुप टप्प्यातील पाच सामने संघ आपल्या होम ग्राऊंड एम. चिन्नस्वामी स्टेडियम येथे खेळणार आहे. यासाठी कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनची मंजुरी मिळाली आहे.

उद्घाटन आणि अंतिम सामना बंगळुरूमध्ये

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2026 चा उद्घाटन सामना आणि अंतिम सामना दोन्हीही बेंगळुरू येथील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर या मैदानावर एक प्लेऑफ सामना देखील आयोजित केला जाणार आहे. आरसीबीचे ग्रुप टप्प्यातील पाच सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर होतील, तर उर्वरित दोन सामने शहिद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियम, रायपूर येथे खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, आयपीएलच्या सुरुवातीची तारीख जाहीर झाली असली तरी स्पर्धेच्या संपूर्ण वेळापत्रकाची चाहत्यांना अजूनही प्रतीक्षा आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version