विजयवाडा : बिहारनंतर आता आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने जातीय जनगणनेचे काम सुरू केले आहे. सरकारच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही जणगणना सुरू करण्यात आली आहे. पुढील 10 दिवस हे सर्वेक्षण चालणार आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) विजयवाडा येथे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांच्या हस्ते डॉ बीआर आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करून जात सर्वेक्षणाला सुरुवात झाली. या पुतळ्याला ‘सामाजिक न्यायाचा पुतळा’ असे नाव देण्यात आले आहे. (After Bihar, Andhra Pradesh government has started the work of caste census)
राज्य मागासवर्गीय कल्याण मंत्री सीएच श्रीनिवास वेणुगोपाल कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारनंतर सर्वसमावेशक जात सर्वेक्षण करणारे आंध्र प्रदेश हे देशातील दुसरे राज्य असणार आहे. यामुळे राज्य सरकारला मागासवर्गीय समाजाची ओळख पटवण्यास मदत होईल आणि त्यातून कल्याणकारी योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील. तीन लाखांहून अधिक गावांमध्ये प्रभाग सचिवालय कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून डेटा अचूकपणे गोळा केला जाईल.
राज्याचे प्रधान सचिव एम गिरिजा शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, प्रभाग सचिवालय कर्मचारी आणि स्वयंसेवक 19 जानेवारीपासून एकूण 1.2 कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करतील. यात ग्रामीण भागातील 3.56 कोटी लोकसंख्या आणि शहरी भागातील सुमारे 1.3 कोटी लोकसंख्या असलेले 44 लाख कुटुंबे आहेत. अशा प्रकारे, एकूण 1.6 कोटी कुटुंबे सर्वेक्षणाच्या कक्षेत येतील.
बिहारमध्ये जात सर्वेक्षणानंतर बराच गदारोळ झाला होता. जात सर्वेक्षण राजकीय हेतूने करण्यात आल्याचे आरोप झाले होते. यानंतर संपूर्ण देशात अशाच प्रकारचे सर्वेक्षण करण्याची मागणी जोर धरू लागली. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेश सरकारनेही असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा देशभरात जात सर्वेक्षणचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.