Download App

YS Sharmila : काँग्रेसशी वैर पत्करत भावाला CM केलं होतं; वायएस शर्मिला पडद्यामागच्या ‘किंगमेकर’

YS Sharmila : राजकारणात काहीच निश्चित नसते असे सांगितले जाते आणि हे वाक्य बऱ्याच अंशी सत्यही आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. इतकच नाही तर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्षात विलीन केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शर्मिला यांची साथ मिळाल्याने दक्षिण भारतात काँग्रेसला आणखी ताकद मिळाली आहे.

कोण आहेत वायएस शर्मिला?

शर्मिला यांचा जन्म सन 1974 मध्ये झाला. त्यांचे वडिल राजशेखर रेड्डी अविभाजीत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यावेळी ते काँग्रेसमध्येच होते. सन 2009 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वायएस जगनमोहन यांना मुख्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र तसं काही घडलं नाही. त्यानंतर सन 2012 मध्ये जगन मोहन यांनी वायएसआर काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. काँग्रेसचे काही आमदार या पक्षात सहभागी झाले होते. मात्र, काही महिन्यांनंतर भ्रष्टाचाराचे आरोपांमुळे जगनमोहन यांना तुरुंगात जावे लागले. त्यावेळी त्यांची आई विजयम्मा आणि बहिण शर्मिला त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.

जगनमोहन तुरुंगात, शर्मिलांनी पक्ष केला बळकट 

जगन मोहन तुरुंगात असताना वायएस शर्मिला यांनीच आता नव्या पक्षाला राज्यात स्थिरस्थावर करण्याचे काम केले. हजारो किलोमीटर पदयात्रा काढली. या पदयात्रेमुळे राज्यात पक्षाचा जनाधार वाढला. त्याचवेळी राज्यातील 18 जागांवर पोटनिवडणुका झाल्या यातील तब्बल 15 जागा वायएसआर काँग्रेसने (YSR Congress) जिंकल्या. एका लोकसभेच्या जागेवरही विजय मिळाला. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळाल आणि जगनमोहन थेट मुख्यमंत्रीच बनले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र जगनमोहन आणि शर्मिला यांच्यात वाद सुरू झाले. मतभेदही होऊ लागले. सन 2021 मध्ये शर्मिला यांनी स्वतःच्या वायएसआर तेलंगणा या पक्षाची स्थापना केली. या पक्षाला त्यांनी तेलंगणात लाँच केले. त्यांची आई विजयम्मा देखील या पक्षात सहभागी झाल्या. तेलंगणा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Telangana Election 2023) शर्मिला यांनी निवडणुकीत पक्षाचे उमेदवारच दिले नाहीत. उलट काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला.

YSSharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची दबंगगिरी; थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा 

शर्मिला ज्यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करत होत्या त्यावेळी त्यांनी सांगितले की मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला कारण काँग्रेस तेलंगणात निवडणूक जिंकेल याची शक्यता जास्त होती. माजी मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात लोकांनी जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली नाहीत. तेलंगणात काँग्रेसने पहिल्यांदाच सरकार स्थापन केले आहे. आता शर्मिला काँग्रेसमध्ये आल्याने जवळच्या आंध्रप्रदेशातही काँग्रेसची ताकद वाढण्यात मदत होणार आहे. यामुळे जगनमोहन यांच्या अडचणी वाढणार हे मात्र नक्की.

follow us

वेब स्टोरीज