Amol Kolhe : शरद पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर व शहराचं पवारांवर प्रेम आहे. त्यामुळेच दोन दशकांनंतर तब्बल साडेतीन तास रोड शो आणि सभेसाठी पवारांनी चिंचवड विधानसभेला वेळ दिली. कारण चिंचवडमध्ये भाकरी फिरवायची आहे. पिंपरी-चिंचवडला भविष्याची चांगली दिशा देऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी पवारांचा कलाटेंवर विश्वास आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे फसलेले घराणेशाहीचे गणित सुधारून राहुल कलाटे यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा विचार विजयी करा. ८४ वर्षांच्या त्या बापाला आठवा, आयुष्याच्या संध्याकाळी त्याला हरु द्यायचं नसतं, अशी भावनिक साद अमोल कोल्हे यांनी चिंचवडकर मतदारांना घातली.
डॉक्टरचा गुण नाही आला तर डॉक्टरच्या भावाकडे जाऊन आपण उपचार घेतो का ? जर असा डॉक्टर चालणार नसेल तर असा आमदार कसा चालेल असाही प्रश्न यावेळी कोल्हे यांनी उपस्थित जनतेला विचारला. चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी काल अमोल कोल्हे यांनी रावेत-किवळे भागात रोड शो केला तसेच वाल्हेकरवाडी, काळेवाडी इथे सभे दरम्यान कोल्हे बोलत होते. यावेळी संजोग वाघेरे, मच्छिन्द्र तापकीर, मयुर कलाटे, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे, अनिता तापकीर, इम्रान शेख, सागर तापकीर, अनिता तुतारे, सुजाता नखाते, सुशिला पवार, सायली नढे आदी उपस्थित होते.
वारं फिरलंय, परिवर्तन अटळ!
आयटी पार्क – औद्योगीकनगरी म्हणून ओळख असलेल्या चिंचवडमध्ये नागरी समस्या, मूलभूत सोयी सुविधांची कमतरता कायम असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे, कंत्राटदार, जमिनी हडपणाऱ्यांना नाही तर; तुमच्या उपयोगी येणाऱ्या राहुल कलाटे यांना एकदा संधी द्या. चिंचवडविधानसभेत तुमचे लोकप्रतिनिधित्व करणारा माणूस तुमच्यासाठी भांडणारा, तुमचे प्रश्न सोडवणारा हवा. त्यामुळे व्यवहार बघणाऱ्या शेठपेक्षा आपला राहुल दादा हक्काचा आहे, असेही कोल्हे यांनी सांगितले.
चिंचवडमधील भ्रष्टाचार कमी करून सर्वांगिण विकास साधण्यासाठी मला एकदा संधी द्या. कर्तृत्वशून्य घराणेशाहीला तुम्ही घरी बसवाल, यावर मला विश्वास आहे. आपला ईव्हीएमवरील अनुक्रमांक एक आहे. आपल्या सर्वांसाठी एक नंबरचेच दर्जेदार काम करण्याचं माझं वचन आहे. – राहुल कलाटे, उमेदवार, महाविकास आघाडी-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
तर चिंचवडमधील भ्रष्टाचार कमी करून सर्वांगिण विकास साधण्यासाठी मला एकदा संधी द्या. माझ्यावर विश्वास ठेवून कर्तृत्वशून्य घराणेशाहीला तुम्ही घरी बसवाल, यावर मला विश्वास आहे. आपला ईव्हीएमवरील अनुक्रमांक एक आहे. आपल्या सर्वांसाठी एक नंबरचेच दर्जेदार काम करण्याचं माझं वचन आहे, अशी ग्वाही राहुल कलाटेंनी दिली.