मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभेवेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एकला चालो रे ची भूमिका जाहीर केली असून, लोकसभेवेळी दिलेल्या पाठिंब्याची महायुतीकडून (Mahayuti) परतफेड बिनशर्त केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार महायुती विधानसभेती काही निवडक जागांवर मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यासाठी शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याच गुप्त बैठकदेखील पार पडल्याचे सांगितले जात आहे. (Mahayuti Will Give Unconditional Support To MNS In Assembly Election)
बैठकीत दोन तास खलबतं
समोर आलेल्या वृत्तानुसार, शनिवारी (दि.20) रात्री मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठाकरे, शिंदे आणि फडणवीस यांच्यात तब्बल दोन तास खलबतं झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर ही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या बैठकीबाबत अद्यात कोणत्याही नेत्याकडून भाष्य करण्यात आलेले नाही किंवा अद्यप महायुतीकडून मनसेला पाठिंबा जाहीर देणार असल्याची घोषणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महायुती आणि मनसेच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरेंनी आतापर्यंत घोषित केलेले उमेदवार कोण?
विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी राज ठाकरेंनी कुणालाही पाठिंबा न देता मनसे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी काही उमेदवारदेखील घोषित केले आहेत यात शिवडीतून बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे – पंढरपूर, लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे, हिंगोली विधानसभा – बंडू कुटे, चंद्रपूर – मनदीप रोडे, राजुरा – सचिन भोयर तर, यवतमाळमधून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज ठाकरे यांनी लोकसभेला दिलेल्या पाठिंब्याची बिनशर्त परतफेड केली जाणार असल्याचे सांगितले जात असून, महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.