मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला…, मुख्यमंत्र्यांनी भाजपचा महापौर मुंबईवर लादल्याचा शिवसेनेचा आरोप
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्यानंतर शिवसेनेने हा महाराष्ट्रासाठी “काळा दिवस” असल्याचा आरोप केला.
Shiv Sena alleges that the Chief Minister imposed a BJP mayor on Mumbai : मुंबई महापालिकेच्या सत्तांतरानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामधून भारतीय जनता पक्षावर आणि नव्या महापौरांवर जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्यानंतर शिवसेनेने हा महाराष्ट्रासाठी “काळा दिवस” असल्याचा आरोप करत अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सामनाच्या संपादकीयमध्ये सुरुवातीलाच रितू तावडे यांचे प्रथम नागरिक म्हणून अभिनंदन करण्यात आले असले तरी त्यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत, त्या पूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करून महापौरपदी विराजमान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तब्बल 42 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर झाल्याचा उल्लेख करत, “भाजपला मुंबईचे महापौरपद मिळवायला साडेचार दशके का लागली?” असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
शिवसेनेने आरोप केला आहे की, मराठी मतांमध्ये फूट पाडून आणि सामाजिक समीकरणे बदलून हे पद मिळवण्यात आले. मुंबई ही मराठी माणसाची राजधानी असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून ती महाराष्ट्रात सामील झाली, याची आठवण करून देत मराठी अस्मितेच्या रक्षणाची जबाबदारी शिवसेनेवरच असल्याचे संपादकीयमध्ये नमूद केले आहे.
निवडणुकीतील मतदानाच्या पद्धतीवर भाष्य करताना जैन, मारवाडी, गुजराती आणि उत्तर भारतीय बहुल भागांत भाजपचे नगरसेवक निवडून आल्याचा उल्लेख करून “मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला आहे” असा दावा करण्यात आला आहे. मुंबईतील मराठी बालेकिल्ल्यांमध्ये शिवसेना विजयी झाली असली तरी, मराठी मतांत फूट पाडण्यासाठी वेगळे उमेदवार उभे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मंत्रालयात खुलेआम लाचखोरी; अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्कला अटक; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा महापौर “मुंबईवर लादला” असा आरोप करत, या सत्तांतरामागे मोठ्या आर्थिक ताकदीचा वापर झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. तसेच उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावर धारावी पुनर्वसनासह विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईतील जमिनींचा लाभ मिळवण्याचा आरोप करण्यात आला आहे. धारावी, मिठागरे, मदर्स डेअरीची जमीन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील भूखंड यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख करत “ही शतकातील सर्वात मोठी लूट” असल्याचे संपादकीयमध्ये म्हटले आहे.
महापौर रितू तावडे यांनी मुंबई खड्डेमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि महिलांसाठी सुरक्षित करण्याचे आश्वासन दिल्याचा संदर्भ देत शिवसेनेने त्यावरही टीका केली आहे. “25 वर्षांचा भ्रष्टाचार बाहेर काढू” या विधानावरून, गेली चार वर्षे प्रशासकीय राजवट असताना झालेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत, तो राज्याच्या गृहखात्याशी संबंधित असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
शिवसेनेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, मुंबईवर उपऱ्यांच्या बळावर सत्ता मिळवणाऱ्यांना भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल. मुंबईतील मराठी अस्मिता, सामाजिक समतोल आणि स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी विरोधक म्हणून ठाम भूमिका घेऊ, असेही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील सत्तांतरानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, महापालिकेतील आगामी निर्णय आणि धोरणांवरून संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
