‘चिकीझिंग’ स्वप्नाळू चिक्याची भावविश्वाला स्पर्श करणारी गोष्ट, 19 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत रंगणार बालपणाचा उत्सव

एका चिमुरड्याच्या स्वप्नपूर्तीची हृदयस्पर्शी कहाणी उलगडणारा ‘चिकीझिंग’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 12T130649.079

Eye-catching trailer for ‘Chikizing’ released! : बालपण म्हणजे निरागस स्वप्नांची दुनिया, अवखळपणाचा आनंद आणि कल्पनांच्या पंखांवर स्वार होऊन भरारी घेण्याचे वय! याच लोभसवाण्या बालविश्वाची सफर घडवणारा आणि एका चिमुरड्याच्या स्वप्नपूर्तीची हृदयस्पर्शी कहाणी उलगडणारा ‘चिकीझिंग’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाचा लक्षवेधी आणि आकर्षक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. लहानग्यांसह मोठ्यांनाही आपल्या बालपणाची आठवण करून देणारा हा चित्रपट येत्या 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या असून, राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी हे सहनिर्माते आहेत. कथेची जबाबदारी राजेंद्र बगाटे यांनी, तर पटकथा आणि संवादलेखन वैभव कुलकर्णी यांनी सांभाळले आहे. बऱ्याच कालावधीनंतर बालकांच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारा आणि त्यांच्या स्वप्नांना, भावनांना व कल्पनाविश्वाला रुपेरी पडद्यावर स्थान देणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ट्रेलरची सुरुवातच एका निसर्गरम्य डोंगराळ गावाच्या विहंगम दृश्याने होते. त्यानंतर गावातील श्रद्धास्थान, डोंगरदऱ्यांमधून धावणारा चिक्या, त्याचा शाळेच्या गणवेशातील वावर आणि त्याच्या अवखळ स्वभावाची झलक दिसते. गलोलीने खेळणे, उलटे होऊन जगाकडे पाहण्याची त्याची गंमत, मित्रमैत्रिणींसोबतची धमाल आणि गावातील मोकळ्या वातावरणात रमणारे बालपण अशा प्रसंगांतून त्याचे विश्व उलगडत जाते. पुढे एका भव्य निवासी शाळेच्या लोखंडी प्रवेशद्वारापाशी पोहोचलेला चिक्या आणि त्या प्रवेशद्वारापलीकडील समृद्ध जगाकडे आशाळभूत नजरेने पाहणारा त्याचा चेहरा लक्ष वेधून घेतो.

कुंपणापलीकडील मुलांचे जग, स्वतःच्या परिस्थितीची जाणीव, मनात दडलेली इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धडपड यांचे भावस्पर्शी चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला साधे गावाकडचे घर, आईचे प्रेम, कष्टमय जीवन आणि दुसरीकडे चिक्याच्या मनात आकार घेणारे मोठे स्वप्न, यांची सुंदर सांगड घालण्यात आली आहे. डोंगराच्या कुशीत उभा राहून स्वप्नांकडे नजर लावणारा चिक्या, आईसोबतचे त्याचे भावविश्व आणि अखेरीस भगव्या पताकेजवळून पुढे जाणारा त्याचा प्रवास या दृश्यांमधून चित्रपटाच्या आशयाची प्रभावी झलक मिळते.

बालपणातील निरागसता आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द यांचा सुरेख मिलाफ या ट्रेलरमध्ये दिसतो. विशेष म्हणजे, ‘चिकीझिंग’ची जगभरातील १६ प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवड झाली असून, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाने आपली उपस्थिती नोंदवली आहे. रिव्हरसाइड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन झाले असून, काही महोत्सवांमध्ये पुरस्कारांनीही त्याचा गौरव झाला आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड!

ट्रेलरविषयी दिग्दर्शक म्हणाले की, “हा ट्रेलर म्हणजे केवळ चित्रपटाची झलक नसून, प्रत्येकाच्या मनात दडलेल्या बालपणाशी पुन्हा एकदा नाते जोडणारा भावनिक प्रवास आहे. चिक्याच्या निरागस स्वप्नांतून प्रत्येकाला स्वतःचे बालपण आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा पुन्हा अनुभवता येतील. हा चित्रपट सर्व वयोगटांतील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांच्या मनालाही स्पर्श करेल, याची आम्हाला खात्री आहे.”

या चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बालकलाकार कृष्णराज वाईंगडे याने साकारलेला चिक्या विशेष लक्षवेधी ठरण्याची चिन्हे ट्रेलरमधून दिसतात. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूही आशयाला पूरक ठरणाऱ्या आहेत. छायांकनाची जबाबदारी प्रवीण सोनावणे यांनी सांभाळली असून, डोंगररांगा, निसर्गसौंदर्य आणि ग्रामीण जीवनातील विविध रंग त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून प्रभावीपणे टिपले आहेत.

अजितदादा महायुती सोडणार होते? अतुल लोंढेंचा दावा, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरून राजकीय हालचालींना वेग

संगीताची धुरा श्रीनिधी वेंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. संकलन शेखर गुरव आणि एस. शंकर यांनी केले असून, कला दिग्दर्शन आणि वेशभूषेची जबाबदारी सुरेश कुंभार यांनी पार पाडली आहे. बालमनातील स्वप्नांची उंची, परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द आणि निरागस भावविश्वाचा आनंद यांची अनुभूती देणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट केवळ बालकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

follow us

संबंधित बातम्या