Download App

मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा कायम, भाजपाच्या शिंदेंना दोन ऑफर; शिंदेंनी केल्या अमान्य?

Maharashtra Election 2024 : निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही (Maharashtra Election) हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागं घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दोन मोठ्या ऑफर दिल्या होत्या. मात्र एकनाथ शिंदेंनी या ऑफर नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

“अजित पवार शरण गेले त्यांनी आमची..” शिंदे गटाच्या नेत्याचा अजितदादांवर हल्लाबोल

मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचं राजकारण सुरू झालं होतं. महायुतीच्या यशात आपलं अधिक योगदान असल्याने किमान दोन ते अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावं, अशी शिंदे यांची भूमिका होती. शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघडपणे मागणी करण्यात येत होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करावी, असा आमदारांचा सूर होता. सोमवारी दिवसभर शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले होते.

विविध मंदिरांमध्ये राज्यभर महाआरती, पूजाअर्चा करण्यात आली. शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे हे राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती. त्यासाठी ठाणे, मुंबईत विभागप्रमुखांकडून कार्यकर्त्यांना ‘वर्षा’ निवासस्थानी जमण्याचे आदेश देण्यात आला होता. परंतु, शिंदे यांनी मध्यरात्री १२.५३ मिनिटाने एक्स समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांनी वर्षा किंवा अन्य कुठे जमू नये, असे बजावले होते.

यानंतर मंगळवारी सुद्धा मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर तोडगा निघू शकला नाही. आज बुधवारी देखील काथ्याकूट सुरुच आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी मागणी आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दिल्लीतून मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब! अमित शाह घोषणा करणार, एकनाथ शिंदे नाराज?

भाजपकडून मात्र मागील अडीच वर्षात केलेल्या त्यागाची आठवण करुन देत आता शिंदेंनी त्याग करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोबतच त्यांना दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्रिपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर या ऑफर देऊनही राज्य पातळीवर निर्णय झाला नाही तर केंद्रीय नेतृत्वाने मध्यस्थी करण्याची गरज असल्याचीही चर्चा आहे.

follow us