Download App

माहीमचा तिढा वाढला! CM शिंदेंशी चर्चेनंतरही सरवणकर ठाम; बैठकीत नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. सरवणकर उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.

Mumbai News : महायुतीत माहीम मतदारसंघावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. भाजपने अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने येथे थेट सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे. आता लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेऊन या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. तरी देखील सरवणकर उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.

महायुतीची सदा सरवणकरांना मोठी ऑफर, अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा होणार?

त्यानंतर एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. या मतदारसंघाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. याआधी सदा सरवणकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यांनी वरिष्ठ नेत्यांची ऑफर स्वीकारली नाही.

यानंतर काल वर्षा निवासस्थानी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. सदा सरवणकरांनी मतदारसंघातून उमेदवारी मागे घ्यावी यासाठी एकनाथ शिंदेंनी त्यांना काही सूचना दिल्या अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत पुन्हा एकदा विचार करा. आपल्याला युती धर्म पाळावा लागेल अशी आठवण त्यांनी सरवणकरांना करून दिली. तरीदेखील सदा सरवणकर यांनी आपली भूमिका बदललेली नाही अशी माहिती मिळाली आहे. मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याने तिढा वाढल्याचे दिसत आहे.

सरवणकरांना विधानपरिषदेची ऑफर

यानंतर महायुतीने शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांना एक खास ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतल्यास त्यांना विधानपरिषदेची संधी मिळणार आहे. मात्र या ऑफरवर सदा सरवणकर यांचा काय प्रतिसाद राहिला याची माहिती मिळालेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात सदा सरवरणकर काय निर्णय घेतात. खरंच उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस?

follow us