पुणे : येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदार पार पडणार आहे तर, 23 तारखेला मतमोजणी होणार असून, प्रमुख उमदवारांच्या हातात मतदारांपर्यंत पोहण्यासाठी आणि प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असून, त्याआधी चिंचवड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी गडकरी साहेब चिंचवड विधानसभा मतदारसंघात तुमचे सहर्ष स्वागत असल्याचे म्हणत प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करत त्यातून बदलाचा मार्ग दाखवा असे नमुद केले आहे.
चिंचवडमध्ये परिवर्तन निश्चित; राहुल कलाटे आमदार होणार : खासदार संजय राऊत
राहुल कलाटे यांचे पत्र नेमके काय?
चिंचवड मतदारसंघात महायुतीकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली असून, जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्याआधी राहुल कलाटे यांनी गडकरींना पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अधोरेखित केले आहे. गडकरींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात कलाटे म्हणतात की, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब चिंचवड विधानसभा मतदारसंघात तुमचे सहर्ष स्वागत!
आपण आज (दि.16) सभेच्या निमित्ताने चिंचवड आणि विशेषतः वाकडमध्ये मतदारांशी संवाद साधायला येणार आहात हे ऐकून अतिशय आनंद होतोय. निवडणुकीचा हा हंगाम सुरु होण्यापूर्वी नुकताच पावसाळा होऊन गेला. वाकड – पुनावळेपासून रावेत – किवळ्यापर्यंतच्या हायवेलगतच्या रस्त्याने किंवा सेवा रस्त्याने प्रवास करतांना आमच्यापैकी अनेकांनी दररोज आपली आठवण काढली. साहेब, परिस्थितीच अशी होती. दररोज ऑफिसला जातांना रस्त्याने जातोय की खड्ड्याने हा प्रश्न आमच्यापैकी अनेकांना पडला. याबद्दल मी हक्काने आपल्याला आज पुन्हा पत्र लिहीत आहे कारण आपला हा संवाद जुनाच आहे.
साधारणपणे 2018 साली पहिल्यांदा याबद्दल आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. तेव्हाही सेवा रस्त्याची परिस्थिती अशीच होती. आपण तातडीने दखल घेत डागडुजीच्या सूचना दिल्या. 2018 पासून ते आता 2024 पर्यंत सातत्याने मी आपल्याला पत्र लिहून वाकड – ताथवडे – पुनावळे – रावेत किवळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी, चौपदरी नवीन सब वे बनविण्यासाठी, नवीन सेवा रस्त्यांसाठी, वाकड ते किवळे सेवा रस्ता दुरुस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तसेच वाकड ते किवळे एलेव्हेटेड कॉरिडॉरसाठी सातत्याने पत्रव्यवहार करतो आहे.
हीच परिस्थिती आमच्या भागातल्या पाण्याची. टँकर मुक्त चिंचवड केवळ दिवास्वप्नच बनून उरले आहे. तशीच स्थिती नद्यांची. एकेकाळी चिंचवडचे वैभव असणाऱ्या नद्यांना आज प्रदूषणाने ग्रासले आहे. हरकत नाही. हे प्रश्न आमच्यासमोर गेली दहा वर्ष जैसे थे आहेत. पण तुम्ही आज येत असल्याने यानिमित्ताने का होईना आपल्याला आमचे प्रश्न समजतील आणि यंदा आपण जुन्या आश्वासनांऐवजी तुम्ही आम्हाला बदलाचा मार्ग दाखवाल, अशी अपेक्षा असल्याचे कलाटे यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणतात की, साहेब, आपली ओळख स्पष्टवक्ता अशीच आहे. भ्रष्टाचार, प्रलंबित कामे याबद्दल आपण नेहमीच पक्षातील सहकाऱ्यांचीही खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे, तुमच्याकडे विश्वासाने आमचे प्रश्न मांडले आहेत. आपण चिंचवडला न्याय द्याल हीच अपेक्षा !