PM Modi On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नाशिकमध्ये (Nashik) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वीर सावरकर (Veer Savarkar) आमचे प्रेरणास्थान आहे. मात्र काँग्रेसचे लोक संपूर्ण देशात वीर सावरकरांना शिव्या देतात. काँग्रेस नेते सावरकरांना शिव्या देतात. महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अपमान करतात. मात्र मी असं ऐकलं आहे की महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या युवराजला सांगितले आहे की, जर महाराष्ट्रात निवडणूक जिंकण्याची असेल तर सावरकरांना शिव्या देऊ नका. त्यामुळे त्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. असं या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले.
तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात जे लोक वीर सावरकरांचा वारसा सांगतात ते लोक आज काँग्रेससोबत आहे. मी आज महाविकास आघाडीला आव्हान देतो की, काँग्रेसच्या युवराजच्या तोंडातून तुम्ही दररोज 15 मिनिट वीर सावरकरांची प्रशंसा करू दाखवावी. पण युवराज कधीच सावरकरांची प्रशंसा करणार नाही. काँग्रेसला आज वीर सावरकरांचे काळ्या पाण्याचे शिक्षेचे दिवस, स्वातंत्र्यासाठी केलेला काम मान्य नाही. देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचे योगदान अतुलनीय आहे पण काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडून बाळासाहेंबाच्या प्रशंसेचा एक शब्दही निघत नाही. अशी टीका देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान करतो तुम्ही युवराजांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंची, त्यांच्या विचारधारेची सार्वजनिकपणे प्रशंसा करून दाखवावी. आज आठ नोव्हेंबर आहे. मी दिवस मोजणार आहे. महाविकास आघाडीकडून उत्तराचे वाट पाहीन. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आमच्याकडे घोषणापत्र तर काँग्रेसकडे घोटाळापत्र, मोदींचा नाशिकमधून विरोधकांवर हल्लाबोल
तसेच या सभेत बोलताना महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद करणार. काँग्रेस आणि आघाडीने देशाला कमजोर करण्याचा काम केला. विरोधक देशाला कमजोर करण्याची एकही संधी सोडत नाही. राज्यात जर विकासाचे काम पूर्ण झाले नाही तर तरुणांना रोजगार मिळणार नाही आणि काँग्रेस आणि आघाडीचे लोक हेच करत आहे. यांनी अटलसेतूचा विरोध केला, मेट्रोचे काम थांबवले. त्यांनी समृद्धीत महामार्गाच्या कामात अडचणी आणल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला संविधान, कोर्ट आणि देशाशी काहीच घेणंदेणं नाही. अशी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.