शहडोल : वर्गात ‘जय श्री राम’चा (Shree Ram Mandir) नारा दिल्याने एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शहडोल जिल्ह्यातील एका शाळेत ही घटना घडली. अब्दुल वाहिद असे या शिक्षकांचे नाव असून विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित शिक्षकांसह शाळेच्या संचालकांना अटक केली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना बुरहार शहरातील ग्रीन बेल्स स्कूलमध्ये घडली. पीडित विद्यार्थ्याचे वय 12 वर्षे असून तो सातवीत शिकतो. वर्गात शिक्षक शिकवित असतानाच विद्यार्थ्याने वर्गात धार्मिक घोषणा आणि जय श्रीरामचा नारा देण्यास सुरुवात केली. हे ऐकूण शिक्षक अब्दुल वाहिद संतापले आणि त्यांनी विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण केली. यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली.
बुधर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनीअब्दुल वाहिद आणि शाळेच्या संचालकाविरुद्ध आयपीसी कलम 153 (गोंधळ घालण्यासाठी वातावरण तयार करणे), 323 (जाणूनबुजून दुखापत करणे), 500 (बदनामी) आणि बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
दोघांनाही शाळेतून अटक करण्यात आली असून हलगर्जीपणा करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावरही कारवाई करण्यात येत आहे, असेही जयस्वाल यांनी सांगितले. यानंतर काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि आरोपी शिक्षकाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधूनही असाच एक प्रकार समोर आला होता. कठुआ जिल्ह्यातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वीच्या विद्यार्थ्याने फळ्यावर खडूने “जय श्री राम” असे लिहिले होते. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद हाफिज आणि शिक्षक फारुख अहमद यांनी विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अंतर्गत गंभीर दुखापत झाली होती.